भोयरे गांगर्डात एस टी पलटी झाल्याने १३ प्रवाशी जखमी
By Admin | Published: May 31, 2017 05:12 PM2017-05-31T17:12:33+5:302017-05-31T17:12:33+5:30
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील खिंडीत बस पलटी झाल्याने १३ प्रवाशी जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पळवे (अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील खिंडीत बस पलटी झाल्याने १३ प्रवाशी जखमी झाले. रस्त्याच्या साईडपट्ट्यावर मुरुम टाकल्याने पारनेर आगाराची पिंप्रीजलसेन - पारनेर ही बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सातपुते वस्तीजवळ पलटी झाली. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांना सुपा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अंजना भास्कर डोंगरे, लक्ष्मीबाई पाडळे, सुलाबाई लोणारे, शारदा गायकवाड, नूतन गायकवाड, चंदूबाई रणशिंग, साक्षी डोंगरे, बाबू टाकनाथ डोंगरे, चंद्रभान सबाजी भोगाडे, नारायण शिवाजी भोगाडे, सुदाम भाऊसाहेब पवार, शिवाजी कोकाटे, गिताबाई कोकाटे यांच्यासह कडूस तसेच पाडळी रांजणगाव येथील प्रवाशी जखमी झाले.
पिंप्रीजलसेन येथून सकाळी सात वाजता चालक डि.बी. थोरात व वाहक महिला कर्मचारी एस.एस. जाधव हे (बस क्रमांक. एम एच १२, ई. एफ. ६८२६ ) निघोज - शिरूर - देवदैठण -भोयरे गांगर्डा मार्गे पारनेरला घेऊन जात होते. बसमधून ५० प्रवाशी प्रवास करत होते. भोयरे गांगर्डा येथून जात असताना हा अपघात घडला. रस्त्याच्या साईड पट्टया खोदल्या आहेत. खोदलेल्या साईडपट्ट्याचा अंदाज न आल्याने बस घसरुन पलटी झाली. अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.