नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १३६ शाळा आऊट आॅफ रेंज; आॅनलाईन प्रशासनाचा भोंगळ कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 07:07 PM2017-12-20T19:07:55+5:302017-12-20T19:08:32+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना आॅनलाईनची सक्ती केली जात असली तरी जिल्ह्यातील १३६ शाळा ‘आऊट आॅफ रेंज’ असल्याचे एका अहवालातून उघड झाले आहेत.
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना आॅनलाईनची सक्ती केली जात असली तरी जिल्ह्यातील १३६ शाळा ‘आऊट आॅफ रेंज’ असल्याचे एका अहवालातून उघड झाले आहेत. शाळा परिसरात नेट सुविधाच नसल्याने सरलसह विविध अहवाल पाठविण्यासाठी शिक्षकांना अडथळ्यांची शर्यत करावी लागत आहे.
सन २०११ मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांचे गुगल मॅपिंग करण्यात आले़ शाळा आॅनलाईनच्या कक्षेत आल्याने शासनाने शाळांची सर्व माहिती आॅनलाईन देणे शिक्षकांना बंधनकारक केले. शाळेतील मुलांना पुरविला जाणारा पोषण आहार, पटसंख्या, शिक्षकांची संख्या, पायाभूत सुविधा, शिक्षण खात्याचे आदेश, बैठका व प्रशिक्षणांचे निरोप देणे, यासारखी कामे आॅनलाईन झाली. शाळांचे अहवाल आॅनलाईन पाठविण्यात येत असल्याचा दावा शिक्षण खात्याकडून करण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यातील १३६ शाळांमध्ये आजही नेट उपलब्ध नाही. अकोले तालुक्यातील सर्वाधिक ५९ शाळांमध्ये रेंज नसल्याने गुगल मॅपिंग झालेले नाही. शाळा परिसरात रेंजच नसल्याने कोणतीही माहिती शिक्षकांना आॅनलाईन देणे शक्य होत नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
शासनाने व्हॉटसअप प्रशासन सुरू केले. परंतु, शाळांना सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. सुविधा न देता शिक्षकांवर आॅनलाईनची कामे लादण्यात आली आहेत. काही शाळांमध्ये रेंज आहे़ परंतु, स्वतंत्र संगणक किंवा लॅपटॉप नाही. यावर कळस असा की काही शाळांना अद्याप वीज जोड नाही. वीज जोडणी झालेल्या शाळांतील वीज पुरवठा थकीत वीज बिलामुळे खंडित करण्यात आलेला आहे. मध्यंतरी शिक्षकांनी पदरमोड करून सेतू केंद्रातून ही माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावर सरकारने बंदी घातली असून, शिक्षकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. रेंज नसल्याने काहींना बैठक, प्रशिक्षण माहिती पाठवा, यासारखे निरोप मिळत नाहीत. त्यामुळे माहिती पाठविण्यास विलंब होतो. माहिती वेळेत न आल्यास संबंधित शिक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रकार घडले असून, रेंज नसल्याने आॅनलाईन कारभारात सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर उपाय योजना करण्याबाबतही सरकार उदासीन असल्याने हा गोंधळ आणखी काही दिवस सुरूच राहणार असल्याचे दिसते.
रेंज नसलेल्या शाळा
अकोले-५९, जामखेड-२०, कर्जत-३, नगर-३, नेवासे-३, पारनेर-३ पाथर्डी-५, राहाता-१५, संगमनेर-२, शेवगाव-१९, श्रीरामपूर-३