घारगाव-पिंपळदरी रस्त्यासाठी उपोषण सुरू; १४ किमीचा हवाय रस्ता, ग्रामस्थांचा पाठींबा
By शेखर पानसरे | Published: December 1, 2023 12:39 PM2023-12-01T12:39:53+5:302023-12-01T12:40:53+5:30
जोपर्यंत रस्त्याचे काम सुरु होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
घारगाव : संगमनेर तालुक्यातील घारगाव-पिंपळदरी रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी घारगाव येथे सामाजिक कार्यकर्ते योगेश भोसले यांनी शुक्रवारपासून (दि.१) उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरु होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोठे बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते संपत जाधव, पोपट भालके, बाबुराव भालके यांनीही भोसले यांना पाठींबा दर्शवत उपोषण सुरु केले आहे. घारगाव ते पिंपळदरी (२३ क्रमांकाचा जिल्हा मार्ग) १४ किलोमीटरचा रस्ता असून हा रस्ता रहदारीचा आहे. हा रस्ता शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या रस्त्यावरून तालुक्यातील साखर कारखान्यांना ऊस वाहतूक सुरु असते. या रस्त्याला घारगाव, बोरबन, कोठे, पिंपळदरी या बागायती गावांसह वाड्या-वस्त्या जोडल्या गेलेल्या आहेत. तसेच रस्त्यावर घारगाव येथील निसर्गरम्य पर्यटनस्थळ कळमजाई देवस्थान, कोठे येथील खंडोबा देवस्थान, पिंपळदरी येथील येडूआई माता अशी ‘क’ वर्गातील देवस्थाने आहेत. येडूआई माता दर्शनासाठी संपूर्ण भाविक मोठ्या संख्येने येतात. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांवर उपोषण करण्याची वेळ आली आहे. तातडीने या रस्त्याचे काम सुरु करावे, यासाठी भोसले यांसह जाधव, भालके यांनी उपोषण सुरु केले आहे. उपोषणस्थळी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, तलाठी दादा शेख यांनी भेट दिली.
या उपोषणाला संत सावता महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष शांताराम गाडेकर, बाजार समितीचे माजी संचालक नाना भालके, शांताराम वाकळे, रमेश आहेर, बाळासाहेब गाडेकर, माजी उपसरपंच सुरेश आहेर, हरूण शेख, जयसिंग आहेर, अनिल आहेर, बाळासाहेब जाधव, संभाजी धात्रक, कारभारी वाकळे, दत्तात्रय गाडेकर, ज्ञानेश्वर आहेर, सुरेश हांडे यांसह घारगाव, बोरबन, कोठे, वनकुटे,पिंपळदरी आदी गावांतील ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.