अहमदनगर महापालिकेचा १४०० कोटींचा अर्थसंकल्प; उत्पन्न वाढीवर भर
By अरुण वाघमोडे | Published: March 27, 2023 03:57 PM2023-03-27T15:57:30+5:302023-03-27T15:57:41+5:30
अंदाजपत्रकातील अनेक तरतुदींमध्ये समितीकडून वाढ सूचविण्यात आली.
अहमदनगर - महापालिका स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी सोमवारी (दि२७)१३८७ कोटी ७९ लाखांचा अर्थसंकल्प महासभेला सादर केला. या अर्थसंकल्पातील तरतुदींवर बुधवारी (दि.२९) होणाऱ्या महासभेत नगरसेवेकांनी चर्चा केल्यानंतर त्याला अंतीम स्वरुप दिले जाणार आहे. महापालिकेत बुधवारी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदिप पठारे, नगरसचिव एस.बी. तडवी आदींसह विभागप्रमुख, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
सभापती कवडे यांनी स्थायी समितीने सूचविलेल्या शिफारशींसह अर्थसंकल्प महापौर शेंडगे यांना सादर केला. दरम्यान आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी स्थायी समितीकडे १३ मार्च रोजी स्थायीकडे १२४० कोटी रुपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर केले होते. यावर स्थायीच्या सभेत दोन दिवस चर्चा झाली. अंदाजपत्रकातील अनेक तरतुदींमध्ये समितीकडून वाढ सूचविण्यात आली. त्यामुळे मुळ अंदाजपत्रकात १४७.७९ कोटींची वाढ होऊन ते १३८७.७९ कोटींपर्यंत जाऊन पोहोचले. मनपाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने नवीन घरांना घरपट्टी लागू करणे, नवीन मालमत्तांची नोंदणी करणे, अनधिकृत बांधलेल्या पत्र्यांच्या गाळाधारकांकडून घरपट्टी आकारणे, मालमत्तांचे रिव्हिजन करणे, आवश्यक त्या ठिकाणी पे ॲण्ड पार्किंग करणे, अनधिकृत बांधकामांचा शोध घेणे, थकीत कराची तातडीने वसुली करणे आदींबाबत गांभीर्याने कार्यवाही करण्याची शिफारस स्थायी समितीने केली आहे.