कोरोनाचे १४१ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:20 AM2021-02-12T04:20:30+5:302021-02-12T04:20:30+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी १४१ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, तर ८३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार सुरू ...
अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी १४१ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, तर ८३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १,१०७ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४६, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८० आणि अँटिजेन चाचणीत १५ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (३५), अकोले (३), नगर ग्रामीण (२३), पारनेर (१०), राहता (१५), संगमनेर (१३), शेवगाव (२), श्रीगोंदा (१४), मिलिटरी हॉस्पिटल (१), जामखेड (४), कोपरगाव (१३), नेवासा (४), राहुरी (३), श्रीरामपूर (१) या रुग्णांचा समावेश आहे.
-----------------
पुणे - नगर - शिर्डी शटल रेल्वेसंदर्भात आज बैठक
अहमदनगर : जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा प्रश्न असलेला पुणे - नगर - शिर्डी शटल रेल्वे सेवा सुरू होण्यासाठी अनेक स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्ष व नेते मंडळी प्रयत्नशील आहेत. पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन या संघटनांनी ही रेल्वेसेवा सुरू होण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी (दि. १२) सकाळी ११ वाजता अहमदनगर रेल्वे स्थानक येथे बैठक बोलावली असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. अहमदनगर रेल्वे स्थानक येथील स्टेशन मॅनेजर तोमर यांनी शटल रेल्वेसाठी प्रयत्नशील व्यक्तींशी संपर्क साधला आहे. या बैठकीसाठी रेल्वे विभागाचे अधिकारी यांच्यासह अॅड. गवळी, हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, सुहास मुळे आदींसह स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
---------------
बाबा आढाव यांचा गौरव
अहमदनगर : वंचित, दुबळे व श्रमिक कामगारांना न्याय मिळण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करणारे कॉम्रेड बाबा आढाव यांना पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने व्हॅलंटाईन डे च्या दिवशी रविवारी (दि. १४ फेब्रुवारी) वर्किंग क्लास लॉरिस्टर ऑफ इंडिया हा सन्मान बहाल केला जाणार आहे. त्यांनी वंचित, दुबळे व श्रमिकांप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल हा सन्मान सोहळा व्हर्चुअल पध्दतीने हुतात्मा स्मारक येथे पार पडणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
-------------
उद्या बिल्डर व आर्किटेक्ट यांचे देशव्यापी आंदोलन
अहमदनगर : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, अहमदनगर आर्किटेक्ट, इंजिनिअर्स ॲण्ड सर्व्हेअर असोसिएशन आणि क्रेडाई संघटनेच्यावतीने सिमेंट व स्टील दरवाढीविरोधात शुक्रवारी (दि. १२) देशव्यापी धरणे आंदोलन व एक दिवसाचा संप करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृहामागील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेचे संस्थापक अध्यक्ष जवाहर मुथा यांनी दिली. मागील काही दिवसांपासून स्टील व सिमेंटच्या दरामध्ये सातत्याने दरवाढ होत आहे. नगरमध्ये काम करणाऱ्या आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स ॲण्ड सर्वेअर्स असा, क्रेडाई आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, अहमदनगर सेंटरच्या वतीने या दरवाढीचा निषेध करत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
संपूर्ण देशात एकाच वेळी हे आंदोलन होणार आहे. तिन्ही संघटनांचे नगरमध्ये दोन हजारपेक्षा जास्त इंजिनिअर्स, बिल्डर्स बांधकाम व्यवसाय करत असून, या सातत्याने होणाऱ्या दरवाढीने हा व्यवसाय धोक्यात आला आहे. या दरवाढीला आळा घालण्यासाठी व संस्थेच्या या मागण्या शासन दरबारी पोहोचण्यासाठी, तसेच सर्वसामान्यांना दर कमी झाल्यावर बांधकाम करणे शक्य होण्यासाठी सदर धरणे आंदोलन करण्याचा मानस आहे. धरणे आंदोलनाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीस अन्वर सरदार शेख, प्रदीप मधुकर तांदळे, अनिल कोठारी, जवाहर मुथा, अध्यक्ष मच्छिंद्र पागिरे, मनोज गुंदेचा, विजयकुमार पादिर आणि तिन्ही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.