नगर जिल्ह्यात १४३७ अंगणवाड्या भाडोत्री जागेत; जि.प.ची जागा नसल्याने अडचण

By चंद्रकांत शेळके | Published: June 21, 2023 07:23 PM2023-06-21T19:23:30+5:302023-06-21T19:23:55+5:30

अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहापर्यंतच्या सुविधांची वानवा आहे.

1437 Anganwadis in the Nagar district on leased premises problem is that there is no place for zp | नगर जिल्ह्यात १४३७ अंगणवाड्या भाडोत्री जागेत; जि.प.ची जागा नसल्याने अडचण

नगर जिल्ह्यात १४३७ अंगणवाड्या भाडोत्री जागेत; जि.प.ची जागा नसल्याने अडचण

अहमदनगर : ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल १४३७ अंगणवाड्या भाडोत्री जागेत, समाजमंदिर किंवा ग्रामपंचायतीच्या खोल्यांत भरत आहेत. त्यामुळे शिक्षणाचा श्रीगणेशा करणाऱ्या बालकांच्या मनावर प्रारंभीच असुविधांचा शिक्का बसत आहे. अनेक अडचणींवर मात करत ग्रामीण भागात अंगणवाड्या सुरू आहेत. जिल्ह्यातील २७ टक्के अंगणवाड्यांना स्वत:ची इमारती नसल्याने ते इतरत्र भरत आहेत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहापर्यंतच्या सुविधांची वानवा आहे.

नगर जिल्ह्यात सुमारे ५ हजार ३७५ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी ४७७ अंगणवाड्या भाडोत्री जागेत, १७९ अंगणवाड्या समाजमंदिरात, २९८ अंगणवाड्या प्राथमिक शाळेत, तर ८७ अंगणवाड्या ग्रामपंचायतीच्या जागेत भरतात. अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांसाठीच्या खेळण्यांचीही परवड सुरू आहे. समाजमंदिरे किंवा अन्य ठिकाणी भरणाऱ्या अंगणवाड्यांत मुलांचे साहित्य ठेवायचे कुठे हा प्रश्न असतो. काही ठिकाणी साहित्य सुरक्षित ठेवण्याची सोय नसल्याने विद्यार्थी खेळणी घरी नेतात तर काही ठिकाणी समाजमंदिरातच ठेवली जातात. नंतर मात्र खेळणी चोरीस जातात.
 
१९८४ अंगणवाड्यांत नाही नळ कनेक्शन
जिल्ह्यातील ५३७५पैकी १९८४ अंगणवाड्यांमध्ये मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी नळ कनेक्शन नाही. तसेच १५४७ ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय नाही. अनेक ठिकाणी सेविकांना बाहेरून पाणी आणावे लागते किंवा बालकांचे पालक घरूनच पाण्याची बाटली देतात. ग्रामपंचायतींकडून तेथे नळ कनेक्शन दिले गेलेले नाही. तसेच स्वच्छतागृहाची सोय नसल्याने बालकांना उघड्यावर जावे लागते.

  • जिल्ह्यातील अंगणवाड्या - ५३७५
  • स्वतःची इमारत असलेल्या - ३९३८
  • स्वतःची इमारत नसलेल्या - १४३७
  • कार्यरत अंगणवाडी सेविका - ४५९५
  • कार्यरत मिनी सेविका - ८१६
  • अंगणवाडी मदतनीस - ४१४२

 
या कारणामुळे नाही स्वतःची इमारत
ज्या १४३७ ठिकाणी अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही त्याचे प्रमुख कारण त्या गावात जिल्हा परिषदेची जागा शिल्लक नसणे हे आहे. जि.प. कडे जागा नसेल तर जागा खरेदी करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे तेवढी आर्थिक तरतूद नाही. त्यामुळे या अंगणवाड्या इतरत्र भराव्या लागतात.
 

Web Title: 1437 Anganwadis in the Nagar district on leased premises problem is that there is no place for zp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.