१५ दिवसापासून कर्जुलेहर्या परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या पिंज-यात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:53 PM2018-01-10T14:53:20+5:302018-01-10T14:54:31+5:30
कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील मांडओहळ रोडवरील कमळजादेवी वस्ती परिसरात बिबट्याचा १५ दिवसापासून मुक्त संचार होता. त्यामुळे शेतकरी, शालेय विद्यार्थी व रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली होती. या अगोदर बिबट्याला पकडणासाठी पिंजरा लावला होता.
टाकळी ढोकेश्वर : कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील मांडओहळ रोडवरील कमळजादेवी वस्ती परिसरात बिबट्याचा १५ दिवसापासून मुक्त संचार होता. त्यामुळे शेतकरी, शालेय विद्यार्थी व रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली होती. या अगोदर बिबट्याला पकडणासाठी पिंजरा लावला होता. परंतु पिंज-यात भक्ष्य नसल्यामुळे हा पिंजरा फक्त शोभेची वस्तू आहे का? असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांना पडला होता. अखेर मंगळवारी रात्री वनविभागाला यश आले असून बिबट्या अखेर पिंज-यात कैद झाला.
कर्जुले हर्या परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याने मांडओहळ धरण परिसरातील कमळजादेवी येथे निवृत्ती भागाजी आंधळे, दत्तू कारभारी शिंदे, सुदाम मारुती आंधळे, शरद बन्सी उंडे यांच्या घराजवळील शेतामध्ये वास्तव्य केले होते. त्यामुळे शेतकरी शेतात रात्री बेरात्री पाणी भरण्यासाठी जाण्यास घाबरत असत. तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी शाळेत जाताना मुठीत जीव घेऊन प्रवास करीत होते. गेल्या पंधरा दिवसात परिसरातील वस्त्यांवरील सर्व कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला होता.
मंगळवारी दुपारी शरद बन्सी उंडे यांच्या घरासमोरील उसाच्या शेतात बिबट्या दिसल्यानंतर टाकळीढोकेश्वर येथील वनविभागाचे वनरक्षक दिनकर मुरूमकर यांना दूरध्वनीवरुन कल्पना दिली. त्यानंतर सर्व वन कर्मचा-यांनी पिंजरा घेऊन कमळजादेवी वस्तीवर जाऊन पिंजरा लावण्यात आला. मंगळवारी रात्री काही काळानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. बिबट्या थोडा आजारी असल्यामुळे त्याला जुन्नर येथील उपचार व निवारा केंद्रात हलविण्यात आले. यावेळी उपवन संरक्षण अधिकारी ए.लक्ष्मी, वनक्षेत्रपाल किसान आगलावे, संजय कडू उपस्थित होते.