महात्मा फुले कृषी विद्यापीठाला १५१ कोटी : सुधीर मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 06:53 PM2019-01-03T18:53:45+5:302019-01-03T18:54:03+5:30
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी १५१ कोटी रूपयांचा निधी दिला जाणार आहे.
राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी १५१ कोटी रूपयांचा निधी दिला जाणार आहे. ेयेथून आयएस अधिकारी बनण्याऐवजी पदवीधर आदर्श शेतकरी तयार व्हायला हवेत. त्यादृष्टीने विद्यार्थी घडविण्याचे काम करावे, असे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
कुलगुरू डॉ़ के़ पी़ विश्वनाथा यांनी विद्यापीठातील विविध विकास कामांसाठी १०१ कोटी रूपयांची मागणी केली होती. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी ही घोषणा केली.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मागोवा २०१८ या कार्यक्रम प्रसंगी अर्थमंत्री बोलत होते. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ११ जिल्ह्यातील वर्षभरातील विविध उपक्रमांची माहिती या कार्यक्रमात दिली जाते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ़ के़ पी़ विश्वनाथा होते़ कृषीदर्शनी, दिनदर्शिका व अॅपचे उद्घाटनही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले़
अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, एका कार्यक्रमात साडेतीन हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला़ मात्र त्यापैकी एकाही विद्यार्थ्याने शेतकरी अथवा पुढारी होईल, असे सांगितले नाही़ हे चित्र बदलण्याची जबाबदारी विद्यापीठांवर आहे़ शेती क्षेत्रातून ५० टक्के रोजगार निर्मिती होते़ महात्मा फुले यांनी शेती मजबुरी असल्याचे शेतकऱ्यांचे असूड या पुस्तकात लिहिले होते़ शेतीमधून आर्थिक शक्ती निर्माण झाली पाहिजे़ कृषी पदवीधर शेतीत आले तर त्यासाठी मुबलक पैसा देण्यास तयार असल्याची ग्वाही अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिली़
प्रास्तविकात कुलगुरू विश्वनाथा यांनी रिक्त जागा भरून विविध प्रकल्पाला मदत करण्याचे आवाहन केले़ शरद गडाख, अशोक फरांदे, डी़ डी़ पवार, मिलींद ढोके यांनी विविध विभागाचा आढावा घेतला़ कार्यक्रमास आमदार शिवाजी कर्डिले, आमदार प्रकाश गजभिये, भास्करराव पाटील, नाथाजी चौगुले, पंकजकुमार महाले़, सुनीता पाटील, विजयकुमार ठोंबरे आदी उपस्थित होते़ सूत्रसंचालन बापूसाहेब भाकरे यांनी केले़ डॉ़ पंडीत खर्डे यांनी आभार मानले.
प्रत्येक विद्यापीठाने दहा गावे दत्तक घ्यावीत..
राज्यातील चारही विद्यापीठांनी प्रत्येकी दहा गावे दत्तक घेऊन शेतकरी, पदवीधर शेतकºयांच्या माध्यमातून बदल घडवून आणावा, असे आवाहनही यावेळी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केले.