जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतींना नाही स्वत:ची इमारत
By चंद्रकांत शेळके | Published: July 18, 2023 11:00 PM2023-07-18T23:00:41+5:302023-07-18T23:01:42+5:30
या ग्रामपंचायतींचा कारभार चक्क शाळेची इमारत, मंदिराच्या सभागृहातून किंवा समाज मंदिरातून चालतो.
चंद्रकांत शेळके, अहमदनगर : पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना मोठे महत्व आहे. आजही वित्त आयोगाचा ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना मिळतो. म्हणजे ग्रामपंचायती या ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असतात. परंतु जिल्ह्यात १५७ ग्रामपंचायती अशा आहेत ज्यांना स्वत: चे कार्यालयच नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार चक्क शाळेची इमारत, मंदिराच्या सभागृहातून किंवा समाज मंदिरातून चालतो.
गावचा कारभार हा ग्रामपंचायतीमधून पाहिला जातो. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर ग्रामस्थांकडून वसूल केले जातात. तसेच शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीमार्फत राबविल्या जातात. अशा स्थितीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना बसायला कार्यालयच नसेल तर ती मोठी नामुष्की ठरते.
नगर जिल्ह्यात १३२० ग्रामपंचायतींपैकी ११६३ ग्रामपंचायतींकडे स्वमालकीचे कार्यालय आहे. तर १५७ ग्रामपंचायतीकडे स्वत: ची इमारत नसल्याने त्यांचा कारभार गावातील इतरत्र भागातील इमारतींमध्ये चालतो. १५७ ग्रामपंचायतींना स्वत: ची इमारतच नसल्याने गावातील विकासाची कामे रेंगाळली आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच गाव, वाड्या, तांड्यावर पायाभूत सुविधा पुरविल्या जातात. त्याचबरोबर गावातील विविध योजनेतील लाखो रुपयांची कामे ग्रामपंचायतीमार्फत राबविले जातात. या कामांची महत्त्वाची कागदपत्रे भाड्याच्या किंवा पर्यायी जागेत ठेवली जातात. त्यामुळे ही कागदपत्रे किती सुरक्षित राहत असतील? असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
इमारत नसलेल्या ग्रामपंचायती
अकोले २४
संगमनेर १५
कोपरगाव ६
राहाता -
श्रीरामपूर ४
नेवासा १६
शेवगाव १८
पाथर्डी ३३
नगर ४
राहुरी ७
पारनेर ७
श्रीगोंदा ६
कर्जत १०
जामखेड ७
एकूण १५७
ग्रामसभा भरते चावडीवर
१५७ ग्रामपंचायतींना स्वत: ची इमारत नसल्याने त्यातील बहुतेक ग्रामपंचायतींच्या वर्षभरातील ग्रामसभा चावडीवर, ओट्यावर किंवा एखाद्या समाजमंदिरात भरण्याची वेळ आलेली आहे.
ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी शासनाकडून निधी दिला जातो. दरवर्षी त्याचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. त्या उद्दिष्टाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. - समर्थ शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जि. प.