मागील वर्षात रोहयो खर्चात १७ कोटींची वाढ
By चंद्रकांत शेळके | Published: April 25, 2023 07:04 PM2023-04-25T19:04:07+5:302023-04-25T19:04:22+5:30
रोजगार हमीच्या कामांवर दिवसेंदिवस मजुरांची संख्या वाढत असल्याने शासनाने रोहयोच्या कामांतही वाढ केली आहे.
अहमदनगर : रोजगार हमीच्या कामांवर दिवसेंदिवस मजुरांची संख्या वाढत असल्याने शासनाने रोहयोच्या कामांतही वाढ केली आहे. परिणामी रोहयोचा खर्च वाढून कामे तर होत आहेतच, शिवाय मजुरांच्या हातालाही काम मिळत आहे. त्याचाच परिणाम २०२१-२२च्या तुलनेत २०२२-२३ या वर्षात रोहयोच्या खर्चात १७ कोटींची वाढ झाली आहे.
जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत रोजगार हमीच्या कामांना मागणी आहे. रोजगार हमी विभागाने मजुरांना ऑनलाईन जॉबकार्डसह अन्य काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पूर्वी मजुरांची हजेरी मस्टरवर घेतली जाई. नंतर पंधरवड्याने त्यांची मजुरी मिळत असत. परंतु आता मजुरांच्या थेट बँक खात्यात मजुरी जमा होते. याचा परिणाम रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांची वाढ होताना दिसत आहे.
सध्या रोजगार हमीवर ‘अ’ वर्गात जलसंधारणविषयक सिमेंट नाला बांध, दगडी नाला बांध, गॅबियन बंधारे, शोषखड्डे, सार्वजनिक शोषखड्डे, सलग समतल चर, पाझर तलाव दुरूस्ती, जमीन सपाटीकरण, गाळ काढणे, वनीकरण, रस्ता दुतर्फा वृक्षारोपण, रोपवाटिका या कामांचा समावेश असून ‘ब’ वर्गात सिंचन विहीर, सार्वजनिक विहीर, शेततळे, फळबाग लागवड, रेशीम उत्पादन, बांधावरील वृक्ष, घरकूल, सामूहिक गोठे, मत्स्यपालन तर ‘क’ वर्गात शौचालय, रस्ता खडीकरण, मुरमीकरण, सिमेंट रस्ता, डांबर रस्ता, ग्रामसंघ इमारत, बाजार ओटा, स्मशानभूमी शेड, सार्वजनिक ठिकाणी सुशोभिकरण ही कामे केली जात आहेत. चालू वर्षी ‘ड’ वर्गात मोडणाऱ्या नावीन्यपूर्ण योजनेत गुरांचा गोठा, शेळीपालन शेड, कुक्कुटपालन शेड, नापेड कंपोस्ट, सार्वजनिक जागेवरील गोदाम, शाळा, अंगणवाडीकडे जाणारा रस्ता, खेळाचे मैदान, शालेय स्वयंपाकगृह, शालेय संरक्षक भिंत, अंगणवाडी बांधकाम, अंगणवाडी इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी कामे होणार आहेत.
जिल्ह्यात २०२१-२२ या वर्षात रोजगार हमी योजनेत कुशल आणि अकुशल कामांवर ७० कोटी १९ लाखांचा खर्च झाला होता. पुढील वर्षी म्हणजे नुकत्याच संपलेल्या २०२२-२३ मध्ये १७ कोटींची वाढ झाली असून या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील रोहयोवरील खर्चाचा आकडा ८७ कोटी २ लाखांवर गेला होता. यात पहिल्यांदाच कुशल कामांवरील खर्च ४० टक्क्यांपर्यंत झालेला आहे.