जिल्हा बँकेच्या १७ जागा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:20 AM2021-02-12T04:20:32+5:302021-02-12T04:20:32+5:30
अहमदनगर : जिल्हा बँकेच्या २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या आहे. नगर, कर्जत आणि पारनेर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीत ...
अहमदनगर : जिल्हा बँकेच्या २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या आहे. नगर, कर्जत आणि पारनेर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीत मात्र निवडणूक होत आहे. तसेच बिगर शेती संस्था मतदारसंघातही निवडणूक होणार आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे बिनविरोध निवडून येण्यात यशस्वी झाले नाहीत.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी गुरुवारी अखेरचा दिवस होता. एकूण १७८ उमेदवारांनी माघार घेतल्याने १७ जागा बिनवरोध झाल्या. उर्वरित चार जागांसाठी येत्या २० फेब्रुवारी रोजी निवडणूक होईल. अकोले तालुक्यातील विविध विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून दशरथ सावंत व सुरेश गडाख व यांनी माघार घेतल्याने जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. अकोल्याचे माजी आमदार वैभव पिचड यांनी मात्र सर्वच मतदारसंघातील अर्ज मागे घेतले. संगमनेर तालुक्यातून माधवराव कानवडे, तर राहुरी तालुक्यातून अरुण तनपुरे हे बिनविरोध झाले. नेवसा तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून अखेरच्या क्षणी रत्नमाला लंघे यांच्यासह इतरांनी अर्ज मागे घेतल्याने मंत्री शंकरराव गडाख हे बिनविरोध झाले. श्रीगोंदा तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातील वैभव पाचपुते यांनी माघार घेतल्याने माजी आमदार राहुल जगताप हे बिनविरोध झाले.
श्रीरामपूर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून करण ससाणे यांनी माघार घेतल्याने भानुदास मुरकुटे हे बिनविरोध झाले. करण ससाणे हे इतर मागास प्रवर्गातून बिनविरोध झाले आहेत. शेतीपूरक मतदारसंघात एकूण २८ जणांचे अर्ज होते. या मतदारसंघातून आमदार आशुताेष काळे हे बिनविरोध झाले आहेत. काळे यांच्या गटाचे चारही अर्ज बुधवारी मागे घेतल्याने विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून विवेक कोल्हे बिनविरोध झाले. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातून सेनेचे खासदार सदाशिव लाेखंडे व माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह इतरांनी माघार घेतल्याने अमित भांगरे हे बिनविरोध झाले. विमुक्त जाती व भटक्या जमाती किंवा विशेष मागास वर्गातील सदस्य मतदारसंघातून गणपत सांगळे हे बिनविरोध झाले असून, महिला राखीवमधून जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे व आशा काकासाहेब तापकीर या बिनविरोध झाल्या आहेत.
....................
लता- कुंज बंगल्यातून हालली सूत्रे
जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असल्याने जिल्ह्यातील नेते नगर शहरात ठाण मांडून होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे यशवंत काॅलनीतील काळे यांच्या लता-कुंज बंगल्यात दिवसभर ठाण मांडून होते. बंद खोलीत उमेदवारांशी चर्चा करत इच्छुकांचा मेळ घातला. दुपारी तीन वाजता अर्ज माघारीची वेळ संपली. ही वेळ संपल्यानंतर थोरात यांच्यासह आघाडीचे नेेते जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या लालटाकी येथील निवासस्थानी दाखल झाले.
..............
जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यावर नेत्यांची रीघ
जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले व उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या लालटाकी येथील निवासस्थानी नेते सकाळीच दाखल झाले होते. आमदार सुधीर तांबे, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दीनानाथ पांडे आदी पदाधिकारी ठाण मांडून होते. दुपारी मंत्री थोरात हेही अध्यक्षांच्या बंगल्यावर दाखल झाले. घुले व फाळके यांनी राष्ट्रवादीकडून खिंड लढविली. चंद्रशेखर घुले यांनी बिनविरोध निवडीसाठी इच्छुकांशी संपर्क केला. दुपारी राहुल जगताप हेही लालटाकी येथे दाखल झाले.
...................
विळदघाटात विखे, कर्डिले
महाविकास आघाडीचे नेते नगर शहरात ठाणम मांडून होते. भाजपकडून माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे आहेत. आमदार राधाकृष्ण विखे यांच्यासह खासदार डॉ. सुजय विखे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, वैभव पिचड ही सर्व नेते मंडळी विळदघाटात ठाण मांडून होते. त्यांनी तेथूनच सूत्रे हलविली.
....
हे झाले बिनविरोध
विविध कार्यकारी सोसायटी : अकोले- सीताराम गायकर, संगमनेर- माधवराव कानवडे, कोपरगाव- विवेक कोल्हे, राहाता- आण्णासाहेब म्हस्के, राहुरी- अरुण तनपुरे, नेवासा- मंत्री शंकरराव गडाख, पाथर्डी- आमदार मोनिका राजळे, श्रीगोंदा- राहुल जगताप, जामखेड- जगन्नाथ राळेभात, श्रीरामपूर- भानुदास मुरकुटे, शेवगाव- चंद्रशेखर घुले.
.....
शेतीपूरक : कोपरगाव- आशुतोष काळे, अनुसूचित जाती व जमाती : अकोले - अमित भांगरे, इतर मागास प्रवर्ग : श्रीरामपूर - करण ससाणे, महिला राखीव : कर्जत - आशा तापकीर, श्रीगोंदा - अनुराधा नागवडे, विमुक्त जाती व भटक्या जमाती : संगमनेर - गणपत सांगळे.
...
आमदार जगताप पिता- पुत्रांची माघार
आमदार अरुण जगताप हे दोन पंचवार्षिक संचालक होते. आमदार संग्राम जगताप व अरुण जगताप यांनी बिगर शेती या मतदारसंघातून अर्ज दाखल केले होते. मात्र अखेरच्या दिवशी संग्राम जगताप यांनी दोन्ही अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदारसंघातून प्रशांत गायकवाड व दत्ता पानसरे यांच्यात लढत होणार आहे.
....
पिचडांच्या माघारीने राजकीय वतुर्ळात चर्चा
माजीमंत्री मधुकरराव पिचड यांचे चिरंजीव माजी आमदार वैभव पिचड यांनी अनुसूचित जाती व जमाती, शेतीपूरक मतदारसंघातून अर्ज दाखल केले होते. त्यांनी अखेरच्या दिवशी गुरुवारी सकाळी दोन्ही अर्ज मागे घेतले. पिचड यांनी माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.