ओढ्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी ओएसआर फाउंडेशनच्या १८ जणांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 03:56 PM2020-10-02T15:56:43+5:302020-10-02T15:57:22+5:30
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ओढ्यावर शेततळे व नांगरट करून अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत अनेकदा निवेदने देवूनही अतिक्रमण काढले जात नसल्याचे ओएसआर फाउंडेशनचे म्हणणे आहे. त्यामुळे या फाउंडेशनच्या १८ सदस्यांनी शुक्रवारी महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून संगमनेर प्रांतकचेरीबाहेर बेमूदत उपोषण सुरू केले आहे.
संगमनेर : तालुक्यातील साकूर येथील ओढ्यावर शेततळे व नांगरट करून अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत अनेकदा निवेदने देवूनही अतिक्रमण काढले जात नसल्याचे ओएसआर फाउंडेशनचे म्हणणे आहे. त्यामुळे या फाउंडेशनच्या १८ सदस्यांनी शुक्रवारी महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून संगमनेर प्रांतकचेरीबाहेर बेमूदत उपोषण सुरू केले आहे.
साकूर येथील गट क्रमांक ४६७/२ पैकी साकूर-संगमनेर रस्त्यालगत पूर्वेकडील ८३ गुंठे जागा ही ओएसआर फाउंडेशनच्या मालकीची आहे. सदर जागेवर परवानगी घेऊन बांधकाम सुरू आहे. या जागेच्या पूर्वेला साधारण १०० फूट व उत्तरेला ६० फ,ूट नैसर्गिक ओढा आहे. परंतू ओढ्याशेजारील शेतमालकाने अतिक्रमण करून शेततळे व शेतजमीन तयार केल्याने या ओढ्याचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. ओढा बुजल्याने पुराचे पाणी हे आमच्या बांधकाम क्षेत्रात घुसते. या बाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसील कार्यालय व साकूर ग्रामपंचायतीला निवेदने देवून अतिक्रमण काढण्याची कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे २ आॅक्टोबरपासून उपोषण सुरू केल्याचे फाउंडेशनने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
रामदास खेमनर, योगेश फिरोदिया, दीपक हजारे, धीरज तिरवाडी, दीपक वखारिया, अनिल मैड, मिथुन केदारी, प्रशांत शेलार, अविनाश रासने, श्रीराम कल्याणकर, बाळासाहेब खेमनर, अरूण गोफणे, संतोष गोफणे, उमेश काजळे, उमेश वखारिया, नितीन लोळगे, किशोर कोळपकर, संतोष पंधारे हे फाउंडेशनचे १८ सदस्य उपोषणाला बसले आहेत.