नगर तालुक्यातील १८ गावे कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:17 AM2021-05-30T04:17:45+5:302021-05-30T04:17:45+5:30

केडगाव : नगर तालुक्यात कोरोनाची स्थिती आता नियत्रंणात येत असून मागील महिन्याच्या तुलनेत या महिनाअखेरीस सक्रिय रुग्णांची संख्या निम्म्याने ...

18 villages in Nagar taluka free from corona | नगर तालुक्यातील १८ गावे कोरोनामुक्त

नगर तालुक्यातील १८ गावे कोरोनामुक्त

केडगाव : नगर तालुक्यात कोरोनाची स्थिती आता नियत्रंणात येत असून मागील महिन्याच्या तुलनेत या महिनाअखेरीस सक्रिय रुग्णांची संख्या निम्म्याने घटली आहे. तालुक्यातील १८ गावे कोरोनामुक्त झाली असून आणखी १८ गावे त्या वाटेवर आहेत. एकूण ३६ गावात रुग्णसंख्या आता दहाच्या आत आली आहे.

तालुक्यात एप्रिलअखेर कोरोना बाधितांची संख्या ९ हजार ८२४ इतकी होती. मे महिन्यापर्यंत ती वाढत जाऊन १४ हजार ७१२ इतकी झाली. तालुक्यात आतापर्यंत १३ हजार ७४३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला तालुक्यात १ हजार २५६ इतके सक्रिय रूग्ण होते. मात्र मे महिन्याच्या अखेरीस ही संख्या निम्म्याने घटली. सध्या ५६७ सक्रिय रुग्ण आहेत. तालुक्यात आतापर्यंत ४०२ जणांना यात जीव गमवावा लागला.

तालुक्यातील १८ गावे कोरोनामुक्त झाले असून सध्या तेथे एकही रुग्ण नाही. आणखी १८ गावांची रुग्णसंख्या प्रत्येकी १ वर आली असून ही गावेही कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. तालुक्यातील ३६ गावात रुग्णसंख्या दहाच्या आत आली आहे.

---

ही गावे झाली कोरोनामुक्त..

हिवरे बाजार, वाटेफळ, हिंगणगाव, हमीदपूर, नेप्ती, शहापूर, पारगाव (भातोडी), रांजणी, कौडगाव, आव्हाडवाडी, उदरमल, बुरूडगाव, देऊळगाव, खडकी, हिवरे झरे, बाबुर्डी बेंद, पिंप्री घुमट, कोळपे आखाडा.

---

कोरोनामुक्तीच्या वाटेवरील गावे..

बारदरी, पिंपळगाव लांडगा, देवगाव, रतडगाव, वारूळवाडी, माथणी, डोंगरगण, पिंपळगाव उज्जैनी, ससेवाडी, पिंपळगाव कौडा, भोयरे खुर्द, मदडगाव, शिंगवे, इस्लामपूर, हातवळण, अंबिलवाडी, पारगाव मौला, पिंपळगाव वाघा.

---

खडकीत १३० लोक कारोनाबाधित होते. आजअखेर एकही रुग्ण नाही. जनता कर्फ्यू काळात १० दिवस पूर्ण गाव बंदचा निर्णय झाला. मात्र त्यानंतरही गाव १ महिना कडकडीत बंद होते. घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली. मोफत औषधे, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना घरी जाऊन धीर दिला. मदत केली. कक्ष विलीनीकरण शाळेत ठेवले. सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

-प्रवीण कोठुळे,

सरपंच, खडकी

----

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची ग्रामस्थांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केली. तसेच ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनास चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आज गाव कोरोनामुक्त आहे. गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी परिश्रम घेतले.

-दीपक साळवे

सरपंच, बाबुर्डी बेंद

Web Title: 18 villages in Nagar taluka free from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.