मतदानासाठी केला १८० किमीचा सायकल प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:23 AM2021-01-16T04:23:21+5:302021-01-16T04:23:21+5:30
राहुरी : मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. यासाठी शासनही वेळोवेळी जनजागृती करत असते. शुक्रवारी मतदान करण्यासाठी ...
राहुरी : मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. यासाठी शासनही वेळोवेळी जनजागृती करत असते. शुक्रवारी मतदान करण्यासाठी एका मतदाराने बारामती ते वळण असा १८० किलोमीटरचा प्रवास चक्क सायकलवरुन केला. विजय भाऊसाहेब बनकर असे या तरूणाचे नाव असून, त्याचे गावात आगमन होताच गावकऱ्यांनीही त्याचा सत्कार केला.
राज्यातील ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक मताला अनन्यसाधारण महत्व असते. त्यामुळे प्रत्येक मत मिळवण्यासाठी उमेदवारही पुरेपूर प्रयत्न करतात. बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना गावात आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येते. परंतु, याचवेळी आपले कर्तव्य बजावण्यासाठी एक ध्येयवेडा तरूण १८० किलोमीटर चक्क सायकलवरुन आल्याने त्याचे कौतुक होत आहे.
राहुरी तालुुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वळण ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान सुरु असतानाच आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी वळण येथील विजय बनकर यांनी थेट बारामतीहून बारा तास सायकलिंग करत गाव गाठले आहे. नोकरीनिमित्त ते बारामती येथे वास्तव्याला आहेत. त्यांना सायकलिंगची प्रचंड आवड आहे. ते दैनंदिन सायकलिंग करतात. त्यांना आपण जेथे नोकरी करतो तेथून आपल्या गावी सायकलिंग करत जाण्याची इच्छा होती. दिनांक १५ जानेवारी हा मतदानाचा दिवस आणि १४ जानेवारी रोजी मकर संक्रांत असल्याने घरी असलेल्या आईकडून तीळगूळ घेण्यासाठी त्यांनी हा दिवस निवडला. सकाळी ७ वाजता त्यांनी बारामतीहून सायकलने प्रवास सुरू केला व सध्यांकाळी ७ वाजता आपले वळण गाव गाठले.
.........
ग्रामस्थांनी केला सत्कार
केवळ बारा तासात बारामतीहून तब्बल १८० किलोमीटरचा प्रवास करत बनकर यांनी वळण गाठले. सायकलने प्रवास करून मतदानाचा हक्क बजावल्याने गावकऱ्यांनीही बनकर यांचा सत्कार केला.
( १५बनकर)