नगर विभागाला १९ नव्या बस; न्यू टेक्नॉलॉजी अन् प्रवाशांचा आरामदायी प्रवास

By चंद्रकांत शेळके | Published: March 30, 2023 06:12 PM2023-03-30T18:12:41+5:302023-03-30T18:13:25+5:30

कोरोना काळ व पुढे कर्मचाऱ्यांचा संप असे दोन वर्षे एसटी महामंडळाला खडतरच गेले.

19 new buses for city department; New technology and comfortable travel for passengers | नगर विभागाला १९ नव्या बस; न्यू टेक्नॉलॉजी अन् प्रवाशांचा आरामदायी प्रवास

नगर विभागाला १९ नव्या बस; न्यू टेक्नॉलॉजी अन् प्रवाशांचा आरामदायी प्रवास

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : गेल्या अनेक वर्षांपासून एसटीच्या ताफ्यातील बस जुनाट झाल्याने त्याचा प्रवासी सेवेवरही परिणाम होत होता. त्यामुळे महामंडळाने आता प्रत्येक जिल्ह्यात काही बस नवीन दिल्या आहेत. यात नगर विभागाला गेल्या महिन्यापूर्वी १९ बस मिळाल्या आहेत. आधुनिक प्रणाली व आरामदायी आसनव्यवस्था हे या बसचे खास वैशिष्ट्य आहे.

कोरोना काळ व पुढे कर्मचाऱ्यांचा संप असे दोन वर्षे एसटी महामंडळाला खडतरच गेले. अनेक दिवस बस जागेवर उभ्या राहिल्याने त्या खराब झाल्या. काही बस पूर्वीच कालबाह्य झालेल्या होत्या. त्यामुळे नव्या बस मिळाव्यात, अशी मागणी विभागाकडून एसटी महामंडळाकडे करण्यात आली होती. नगर जिल्ह्यात सध्या सर्व ११ आगारांकडे सुमारे ६०० बस आहेत. यातील बहुतांश बस खराब झाल्याने १०० बस नवीन मिळाव्यात अशी मागणी केलेली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १९ बस उपलब्ध झाल्या आहेत. १९ पैकी १० बस तारकपूर व ९ बस संगमनेर आगाराला देण्यात आल्या आहेत.

आकर्षक बस, आरामदायी प्रवास

नवीन मिळालेल्या १९ बस आकर्षक व आरामदायी आसनाच्या आहेत. बीएस ६ प्रणाली, एमएस बॉडी अशी काही या बसची वैशिष्ट्ये आहेत. या बस परिवर्तन प्रकारातील असल्याने साध्या बसचे तिकीटच या बससाठी आकारले जाते. तारकपूर आगाराने सर्व १० बस नगर-कल्याण या मार्गावर सोडलेल्या आहेत.

मोबाइल चार्जिंगची सोय

या बसमध्ये काही आसनांवर मोबाइल चार्जिंगची सोय आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांची चांगली सोय होते. दिसायला आकर्षक व आरामदायी आसन असलेल्या या बसला प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 

Web Title: 19 new buses for city department; New technology and comfortable travel for passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.