शेवगावच्या ‘त्या’ १३ गावांना मिळणार १९ लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:20 AM2021-03-28T04:20:32+5:302021-03-28T04:20:32+5:30
शेवगाव : तालुक्यात गतवर्षी अवकाळीसह गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच मदत वर्ग केली जाणार आहे. तालुक्यातील ...
शेवगाव : तालुक्यात गतवर्षी अवकाळीसह गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच मदत वर्ग केली जाणार आहे. तालुक्यातील १३ गावांतील शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ५०० रुपयेप्रमाणे मदत मिळणार आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली होती. तसेच शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. गतवर्षी तालुक्यातील भातकुडगाव परिसरात फेब्रुवारी, मार्च दरम्यान अवकाळी अतिवृष्टी होऊन गारपीट झाल्याने १३ गावातील शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. मागील महिन्यात या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बाधित पिकांसाठी ३३ लाख ९७ हजार रुपयांची मदत प्राप्त झाली होती.
भायगाव, खामगाव, हिंगनगाव, जोहरापूर, दहिफळ, भातुकडगाव, कर्जत, ताजनापुर, खुंटेफळ, बोडखे, दादेगाव, लाखेफळ, एरंडगाव या १३ गावात गहू, हरबरा असे ५३२ शेतकऱ्यांचे १३८.७ हेक्टर रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याची हेक्टरी १३ हजार ५०० रूपये प्रमाणे १८ लाख ६३ हजार ९४५ रुपयांची मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.
नुकसानग्रस्त गावच्या याद्या कामगार तलाठी यांनी सादर केल्या असून मदतीचे धनादेश लवकरच बँकेत सुपुर्द केले जाणार आहेत.