१९८ मतदान केंद्रे होणार स्थलांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 04:56 PM2018-07-18T16:56:18+5:302018-07-18T16:57:19+5:30
जिल्ह्यातील सद्य:स्थितीत असलेल्या मतदान केंद्रांपैकी १९८ केंद्रांच्या इमारती सुस्थितीत नसल्याने ही केंद्रे दुसऱ्या इमारतीत हलविण्यात येणार आहेत.
अहमदनगर : जिल्ह्यातील सद्य:स्थितीत असलेल्या मतदान केंद्रांपैकी १९८ केंद्रांच्या इमारती सुस्थितीत नसल्याने ही केंद्रे दुसऱ्या इमारतीत हलविण्यात येणार आहेत. याशिवाय एकाच केंद्रावर १४०० पेक्षा जास्त मतदार झाल्याने ५९ नवीन केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू असून, या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण ३ हजार ५९९ मतदान केंद्रांपैकी १४०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या ५९ मतदान केंद्रांचे विभाजन करून सदर ठिकाणी नवीन मतदान केंद्र निर्माण करण्याचे नियोजित आहे. तसेच जिल्ह्यातील १९८ मतदान केंद्रांच्या इमारती सुस्थितीत नसल्यामुळे अथवा त्यांची काही प्रमाणात पडझड झाल्याने सदर मतदान केंद्रे इतर इमारतींमध्ये स्थलांतरित करावी लागणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ३५९९ मतदान केंद्रांची यादी निवडणूक शाखा, तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये आणि उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये १३ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.