नियम तोडणाऱ्यांना २ कोटीचा दंड; तरीही नागरिक रस्त्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:21 AM2021-05-08T04:21:32+5:302021-05-08T04:21:32+5:30
अहमदनगर : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी नगर जिल्ह्यात १ लाख ७ हजार ८२३ ...
अहमदनगर : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी नगर जिल्ह्यात १ लाख ७ हजार ८२३ केसेस करत तब्बल २ कोटी १२ लाख ३९ हजार २८९ रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलिसांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असतानाही काही बेफिकीर नागरिक आजही नियमांचे उल्लंघन करत कोरोनाला आमंत्रण देताना दिसत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाने मार्चपासून ‘ब्रेक द चैन’ची घोषणा करत कडक निर्बंध लागू केले आहेत. पोलिसांनीही नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करत १ मार्च ते ४ मे या दोनच महिन्यांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून तब्बल १ कोटी ४४ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. घराबाहेर पडल्यानंतर मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनाकारण बाहेर फिरणे, नियमांचे उल्लंघन करून रेस्टॉरंट, बार, दुकाने सुरू ठेवणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई पोलिसांकडून झाली आहे. पोलिसांकडून नियमांची कडक अंमलबजावणी सुरू असली तरी अनेक बेफिकीर नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येतात, गर्दी करतात. त्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत.
.........
...अशी झाली दंडात्मक कारवाई
विनामास्क फिरणे
केस- ८६,२५४ दंड- १,४७,५६,५००
सोशल डिस्टंन्सिंगचे उल्लंघन
केस- ४,०५९ दंड- १४,१६,२००
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे-
केस- ४,४५७ दंड- ९,२०,०००
रेस्टॉरंट, बार सुरू ठेवणे
केस- ६ दंड- २४,०००
दुकाने सुरू ठेवणे-
केस- २९९ दंड- ३,९०,५००
मंगल कार्यालयात गर्दी करणे
केस- २८ दंड- २,६५,०००
वाहनांवरील कारवाई-
केस- १२,७२९ दंड- ३४,६७,०९०
...............
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लागू करण्यात आलेल्या नियमांची जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून कडक अंमलबजावणी सुरू आहे. नियमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाभरात पोलीस स्टेशनस्तरावर विशेष पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे.
-राजेंद्र पाटील, निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा
........
चारच दिवसांत साडेपाच हजार जणांवर कारवाई
१ ते ४ मे या चार दिवसांत पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ हजार ५३८ जणांवर कारवाई करत १८ लाखांचा दंड वसूल केला आहे.