परतीच्या पावसाने पारगावात ५०० कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 03:28 PM2019-11-09T15:28:43+5:302019-11-09T15:29:07+5:30
पारगाव सुद्रिक परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. सुमारे १ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, डाळिंब, लिंबोणीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
बाळासाहेब काकडे ।
श्रीगोंदा : पारगाव सुद्रिक परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. सुमारे १ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, डाळिंब, लिंबोणीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. कर्ज काढून शेतकºयांनी फळझाडांची लागवड केली होती़ मात्र, पावसामुळे बळीराजाचे ५०० कोटींचे नुकसान होऊन सारा गाव कर्जाच्या ओझ्याखाली सापडला आहे.
सुमारे १ हजार ७६१ हेक्टर क्षेत्र असलेल्या पारगाव सुद्रिक खेतमाळीसमध्ये ५०० हेक्टर क्षेत्रात द्राक्षे, ४२५ हेक्टर क्षेत्रात लिंबोणी व ३२५ हेक्टर क्षेत्रात डाळिंब, संत्री पेरूच्या बागा आहेत.
हे कृषी वैभव उभे करण्यासाठी ३ लाख ते १ कोटी २५ हजार दरम्यान सर्व शेतकºयांच्या डोक्यावर प्रत्येकी कर्जाचा बोजा आहे. पारगावमधील बळीराजा हिमतीने शेती करीत होता. पण परतीच्या पावसाने फळबागा उद्ध्वस्त केल्या. या बागा वाचविण्यासाठी शेतकºयांनी दिवाळी साजरी न करता औषधेफवारणीसाठी लाखो रुपयांचा खर्च केला. सारे पावसाने धुवून नेले. सारा गाव कोट्यवधी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे.
तालुका कृषी अधिकारी पद्मनाथ म्हस्के, मंडल अधिकारी आबासाहेब भोरे, सहाय्यक कृषी अधिकारी के.बी.अनारसे, कामगार तलाठी बशीर शेख यांनी पंचनामे करण्याची मोहीम हाती घेतली. पण शासनाच्या मदतीने आमचे नुकसान भरु शकणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी शहाजी हिरवे, राजेंद्र मोटे यांनी व्यक्त केली.
दिवाळीचा सण साजरा केला नाही. पण द्राक्षाला औषधे फवारली. पण काहीच उपयोग झाला नाही. साºया बागा निकामी झाल्या. आता कर्जाची परतफेड कशी करायची? असा प्रश्न आहे, असे शेतकरी भानुदास हिरवे यांनीू सांगितले.
श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक नुकसान पारगावात द्राक्ष उत्पादक शेतकºयांचे झाले आहे. त्यांना मदत करण्याचा प्रयत्न चालू आहे, असे तालुका कृषी अधिकारी पद्मनाथ म्हस्के यांनी सांगितले.