कोरोनाच्या मुकाबल्यासाठी साईसंस्थानकडून ५१ कोटी; पोलिसांसह गरजू व कर्मचा-यांना नाष्टा, भोजन पुरविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 09:48 AM2020-03-27T09:48:39+5:302020-03-27T09:49:55+5:30
कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी साईबाबा संस्थानने ५१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थानकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा अपेक्षीत आहे.
शिर्डी : कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी साईबाबा संस्थानने ५१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थानकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा अपेक्षीत आहे. प्रत्येक राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाच्या व नागरिकांच्या पाठिशी उभे राहून मदत करण्याची साईबाबा संस्थानची पंरपरा आहे. त्याला अनुसरून संस्थानवर उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तदर्थ कमिटीने कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ५१ कोटींची मदत करून संस्थानची सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय घेतला असल्याचे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. या समितीत जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर, सहाय्यक धमार्दाय आयुक्त गीता बनकर, अतिरिक्त विभागीय महसूल आयुक्त दिलीप स्वामी व संस्थानचे सीईओ अरूण डोंगरे यांचा समावेश आहे. देश-विदेशातील भाविकांनी दान रूपाने जमा केलेला पैसा संकटसमयी त्यांच्या कामास यावा अशीही संस्थानची भावना असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थित होते. हा निधी मुख्यमंत्री निधीत जमा केला जाण्याची शक्यता आहे. संस्थानने पैशाऐवजी तातडीच्या औषध खरेदीच्या रूपाने हा निधी द्यावा, असे राज्य सरकारने सूचवले होते. मात्र संस्थानच्या घटनेत टेंडर प्रक्रिया राबवल्याशिवाय खरेदीची तरतूद नसल्याने संस्थानचा नाईलाज झाला आहे. साईबाबा संस्थानकडून जिल्हा पोलिसांना बुंदी व चिवड्याची पाकिटे साईबाबा संस्थान प्रसादालयातील कर्मचा-यानी रात्रभर जागून बुंदीची तीन व चिवड्याची तीन हजार पाकिटे बनवली आहेत. संस्थान सीईओ अरुण डोंगरे यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी (२७ मार्च) सकाळी साडेनऊ वाजता ही पाकिटे संस्थान प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात यांनी वाहनात भरून अहमदनगर पोलीस मुख्यालयाकडे रवाना केली. सर्वत्र बंद असल्याने खेडोपाडी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस बांधवाच्या अल्पोपहारासाठी संस्थानने ही पाकिटे पाठविली असल्याचे डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे यांनी सांगितले. गरजुंसाठी भोजन व्यवस्था संस्थानने प्रसादालय बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी संस्थानची दोन्ही रूग्णालयातील रूग्ण, त्यांच्या सोबतचा नातेवाईक, शहरातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम, मुकबधीर विद्यालय, बंदोबस्तावरील पोलिसांना जेवण देण्यात येत आहे. याशिवाय संस्थान व नगरपंचायतीच्या आरोग्य व सुरक्षा कर्मचाºयांना सकाळी चपाती, भाजीचा नाष्टा देण्यात येत आहे. शहरातील गोरगरीब व गरजुंसाठी मदत करण्याचा संस्थानचा मानस असून याबाबत गांभिर्याने विचारविनीमय सुरू आहे, असेही संस्थानतर्फे सांगण्यात आले.