२ हजार १७८ विहिरी अपूूर्ण
By Admin | Published: April 26, 2016 11:22 PM2016-04-26T23:22:01+5:302016-04-26T23:26:47+5:30
अहमदनगर : ‘लोकमत’ने राज्यातील चार जिल्ह्यातील विविध योजनांमधील विहिरींचा ग्राऊंड रिपोर्ट मंगळवारी प्रसिद्ध केला. या वृत्तामुळे नगर जिल्ह्यातील रोजगार हमी विभागात दखल घेतली़
अहमदनगर : ‘लोकमत’ने राज्यातील चार जिल्ह्यातील विविध योजनांमधील विहिरींचा ग्राऊंड रिपोर्ट मंगळवारी प्रसिद्ध केला. या वृत्तामुळे नगर जिल्ह्यातील रोजगार हमी विभागात दखल घेतली़ जि. प. च्या रोजगार हमी विभागाने चालू आर्थिक वर्षातील पूर्ण-अपूर्ण विहिरींच्या कामाचा मंगळवारी आढावा घेतला. दरम्यान, नगरमधील २ हजार १७८ विहिरींची कामे अपूर्ण असल्याची माहिती रोहयो विभागाने दिली.
जिल्ह्यात २०११-१२ पासून रोहयोतून ६ हजार ९५१ विहिरींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यातून प्रत्यक्षात ५ हजार ७८० कामे सुरू होवू शकली. यातील ३ हजार ६०२ कामे पूर्ण झाली असून २ हजार १७८ कामे अपूर्ण आहेत. अपूर्ण राहणारी कामे कुशल-अकुशल कामाच्या ६०-४० च्या प्रमाणात अडकलेली आहेत. केंद्र सरकारच्या रोहयो योजनेतून विहिरी खोदण्याच्या अध्यादेशात या विहिरींना कठडे बांधणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. काही तालुक्यात हे कठडे न बांधल्याने विहिरींची कामे अपूर्ण दिसत आहेत. तसेच अनेक विहिरींचे कामे अर्धवट झाल्याने तेथे माती पडून त्या विहिरी बुजल्या आहेत़
सरकारने २०१५-१६ मध्ये पुढील तीन वर्षात रोजगार हमी योजनेतून खोदण्यात येणाऱ्या विहिरींचे नियोजन केलेले आहे. यात २०१५-१६ मध्ये ६६७ विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट असताना १ हजार ६५ विहिरी खोदण्यात आलेल्या आहेत. चालू वर्षात हे उद्दिष्ट ९२७ आहे. २०१२ पासून विहिरीसाठी १ लाख ९० हजार अनुदान होते. त्यानंतर हे अनुदान ३ लाख करण्यात आलेले आहे. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर नगर जिल्हा परिषदेला नागपूरहून तातडीने रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्ह्यात झालेल्या विहिरींच्या कामाबाबत विचारणा झाली होती. (प्रतिनिधी)
़़़तर विहिरींचे पुन्हा सर्वेक्षण
जिल्ह्यात ‘रोहयो’तून मंजूर झालेल्या आणि खोदण्यात आलेल्या विहिरींची आणि लाभार्थ्यांची माहिती रोहयोच्या संकेतस्थळावर आॅनलाईन टाकण्यात आलेली आहे. जिल्ह्यात ९०० विहिरींची कामे कुशल-अकुशलच्या फेऱ्यात अडकलेली आहेत. त्यातून मार्ग काढण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. रोजगार हमी योजनेतून यापूर्वी कामे सुरू असणाऱ्या विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले असून वरिष्ठांनी सूचना दिल्यास पुन्हा सर्वेक्षण करण्यात येईल, अशी माहिती रोजगार हमी योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजय धारस्कर यांनी दिली.