व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची २० कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:23 AM2021-02-09T04:23:38+5:302021-02-09T04:23:38+5:30
श्रीरामपूर : तालुक्यातील माळवाडगाव येथील किराणा व भुसार मालाचे व्यापारी रमेश मुथा व गणेश ऊर्फ मुन्ना मुथ्था या दोघा ...
श्रीरामपूर : तालुक्यातील माळवाडगाव येथील किराणा व भुसार मालाचे व्यापारी रमेश मुथा व गणेश ऊर्फ मुन्ना मुथ्था या दोघा बंधूंनी गोदावरी नदीकाठच्या परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे भुसार खरेदीचे २० कोटी रुपयांहून अधिक पैसे बुडवून धूम ठोकली आहे. राष्ट्रीयीकृत बँक व काही पतसंस्थांनाही त्यांनी ठगवले आहे. यापूर्वी बोरा नामक व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना फसविल्याचे प्रकरण ताजे असतानाच हा नवा प्रकार समोर आला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
माळवाडगाव येथील विविध बँकांकडे तारण असलेली इमारत, कार, पिकअप सोडून शनिवारी मध्यरात्री त्यांनी कुटुंबीयांसह पलायन केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. चाळीसगाव-सोयगांव तालुका सीमेवरील नागद (ता. सोयगाव) येथून स्थलांतर करून मुथ्था श्रीरामपूर तालुक्यात १९९८ मध्ये माळवाडगावची व्यापारासाठी निवड केली. अवघ्या वीस वर्षांत भाडोत्री घरातून स्वत:चे मालकीचे क़ोट्यवधी रुपयांच्या दुमजली हवेलीत पदार्पण केले. वरती आलिशान मजला खाली किराणा दुकान, टेम्पो, ट्रक, तसेच भुसार मालाचे गोदाम त्यांनी उभारले.
मुथ्था यांच्या गोदामावर दररोज सुमारे २० लाख रुपयांची उलाढाल होत होती. मुठेवाडगांव, भामाठाण, खानापूर, खोकर, कारेगाव, उंदीरगांव, वडाळा महादेव, गोदावरीच्या पलीकडच्या वैजापूर तालुक्यातील शेतकरीदेखील सोयाबीन, मका, हरभरा भुसार मुथ्था यांच्याकडे विक्रीसाठी आणत.
एका अंत्यविधीसाठी बाहेरगावी जात असल्याचे गोदामावरील कर्मचाऱ्यांना सांगून कुटुंब शनिवारी गाव सोडून गेले. मात्र, काही शेतकऱ्यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे मुथ्था यांचे बिंग फुटले. शेतकऱ्यांनी तालुका पोलिसांकडे तक्रार अर्ज करीत मुथ्था यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
यापूर्वी नवल बोरा या व्यापाऱ्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे १५ लाख रुपये बुडवून पलायन केले आहे. त्या प्रकरणात मात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, बोरा हा फरार झाला आहे.