चिचोंडी पाटीलमध्ये २० कोंबड्या करणार नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:20 AM2021-01-22T04:20:12+5:302021-01-22T04:20:12+5:30
अहमदनगर : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अहवालातून ...
अहमदनगर : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या भागातील एक किलोमीटर परिसरातील सुमारे २० हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावणार आहे. तसेच १० किलोमीटर परिघातील कोंबड्यांच्या विक्री व वाहतुकीवर तीन महिनेे निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.
गेल्या १० दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी तसेच नगर तालुक्यातील निंबळक, चिचोंडी पाटील, आठवड येथे सुमारे १७५ कोंबड्या मृत आढळल्या होत्या. याशिवाय श्रीगोंदे, जामखेड तसेच नगर तालुक्यांत काही वन्यपक्षी मृत सापडले होते. यातील श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील कावळ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. परंतु, आतापर्यंत कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू असल्याचे आढळले नव्हते.
दरम्यान, गुरुवारी चिचोंडी पाटीलमध्ये मृत झालेल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन अलर्ट झाले असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संसर्ग केंद्रापासून एक किलोमीटरचा परिसर हा बाधित क्षेत्र (इन्फेक्टेट झोन) व १० किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केल्याचे आदेश काढले आहेत. इतर भागात या रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून बाधित क्षेत्रातील कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करून विल्हेवाट लावण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. तसेच सदर परिसर कुक्कुट शेड निर्जंतुकीकरण करून १० किलोमीटर त्रिज्येतील परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील ९० दिवस प्रतिबंध करण्यात आला आहे.
------------
अशी लावणार विल्हेवाट
बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्ष्यांची तसेच निगडित खाद्य व अंडी यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत जलद कृती दलास आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे.
---------
या परिसरात अलर्ट झोन
भोयरेपठार, चिचोंडी पाटील (ता. नगर), आढळगाव, टाकळी कडेवळीत (ता. श्रीगोंदा), कोकमठाण (ता. कोपरगाव), घारगाव (ता. संगमनेर), पारनेर, लोणी बु. (ता. राहता), शेरणखेल, धामणगाव (ता. अकोले), श्रीगोंदा येथे कोंबड्या तसेच वन्य पक्षी मृत आढळले असल्याने तेथील १० किलोमीटर त्रिज्येतील परिसर सतर्क भाग (अलर्ट झोन) म्हणून प्रशासनाने घोषित केला असून या परिसरात कोंबड्यांच्या वाहतूक व विक्रीवर निर्बंध असतील.