२० हजार विद्यार्थ्यांनी दिली घरबसल्या शिष्यवृत्तीची सराव परीक्षा

By चंद्रकांत शेळके | Published: October 2, 2023 05:52 PM2023-10-02T17:52:25+5:302023-10-02T17:52:56+5:30

शनिवारी रात्री साडेसात ते नऊ व रविवारी सकाळी ८ ते साडेनऊ या वेळेत घेतली परीक्षा

20000 students took the scholarship practice exam from home | २० हजार विद्यार्थ्यांनी दिली घरबसल्या शिष्यवृत्तीची सराव परीक्षा

२० हजार विद्यार्थ्यांनी दिली घरबसल्या शिष्यवृत्तीची सराव परीक्षा

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: पुढील शैक्षणिक जीवनात स्पर्धा परीक्षेची पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, म्हणून शिक्षण विभागाने पुढाकार घेत रविवारी ऑनलाइन शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेतली. तब्बल २० हजार विद्यार्थ्यांनी घरी बसून पालकांच्या मोबाइलवर ही परीक्षा दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या संकल्पनेतून यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीमध्ये अहमदनगर जि.प. शाळांतील जास्तीत जास्त विद्यार्थी यावेत यासाठी विविध उपक्रम सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून शिक्षकांना शिष्यवृत्ती परीक्षेचे वार्षिक वेळापत्रक तयार करून दिले असून त्याप्रमाणे घटकनिहाय मासिक अध्यापन करायचे आहे. तसेच महिन्यात शिकविलेले घटक विद्यार्थ्यांना कितपत समजले यासाठी फक्त शिकविलेल्या घटकांवर आधारित ऑनलाइन चाचणी घेऊन त्यांचे मूल्यमापन करण्याची संकल्पना भास्कर पाटील यांनी मांडली.

त्यानुसार विद्यार्थ्यांचे पालक घरी असताना पालकांच्या मोबाइलवरून विद्यार्थ्यांना चाचणी सोडविता यावी, यासाठी शनिवार (दि. ३०) व रविवार (दि. १) असे सुटीचे दिवस निवडले. शनिवारी रात्री साडेसात ते नऊ व रविवारी सकाळी ८ ते साडेनऊ या वेळेत जिल्ह्यातील २० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामध्ये इयत्ता पाचवी मराठी माध्यमाच्या १२ हजार ६३०, उर्दू माध्यमाच्या ९००, तसेच इयत्ता आठवीच्या ६ हजार ५४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षेचा निकाल शिक्षण विभागाच्या https://www.eduprimaryanagar.in/p/blog-page_85.html या संकेतस्थळावर घोषित केला असून,
विद्यार्थी, पालक, शिक्षक आपापल्या निकालाची पडताळणी करू शकतात.

परीक्षा यशस्वितेसाठी शिष्यवृत्ती विभागप्रमुख विस्तार अधिकारी मनीषा कुलट, विस्तार अधिकारी जयश्री कार्ले, तंत्रस्नेही शिक्षक बाबासाहेब पवार, मिलिंद जमादार, तसेच जिल्हा आयटी समन्वयक रवी भापकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

सरावासाठी संकेतस्थळावर ३० सराव चाचण्या

ऑनलाइन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासास चालना देणारी अहमदनगर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. जिल्हा परिषद संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या सरावासाठी अगोदरच पाचवी व आठवीच्या प्रत्येकी ३० ऑनलाइन चाचणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डिसेंबर महिन्यापासून सर्व अभ्यासक्रमावर आधारित चाचणीही घेण्यात येणार आहे.

राज्य गुणवत्तायादीत अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी स्थान मिळवतील या उद्देशाने शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाचे मासिक व वार्षिक नियोजन केले आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर १० स्वतंत्र चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यामुळे निश्चितच यावेळी राज्य गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त विद्यार्थी स्थान मिळवतील, असा विश्वास वाटतो.
-भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Web Title: 20000 students took the scholarship practice exam from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.