विंचरणेच्या तीरावर २१ फूट उंचीची महादेवाची मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:26 AM2021-02-17T04:26:46+5:302021-02-17T04:26:46+5:30
जामखेड : जामखेडच्या विंचरणा नदीचे पुनरुज्जीवन केल्यानंतर नदीतीरावर भगवान महादेवाच्या २१ फूट उंचीच्या आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करून नदीच्या आणि ...
जामखेड : जामखेडच्या विंचरणा नदीचे पुनरुज्जीवन केल्यानंतर नदीतीरावर भगवान महादेवाच्या २१ फूट उंचीच्या आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करून नदीच्या आणि शहराच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. जामखेड शहरातील २१ जोडपे आणि स्वच्छतेसह विविध सामाजिक कामात आपल्या आमदार मुलाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमदार रोहित पवार यांचे आई-वडील या सर्वांच्या हस्ते विधिवत पूजा करून या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारलेल्या श्री भगवान शंकराच्या या आकर्षक मूर्तीमुळे जामखेड शहराचं रूप पालटण्यास मदत झाली आहे. आमदार पवार यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे हाती घेतली.
झाडाझुडपांनी वेढलेल्या आणि कचऱ्याने भरलेल्या जामखेडच्या विंचरणा नदीच्या साफसफाईचे आणि गाळ काढण्याचे काम प्राधान्याने हाती घेऊन नदीचा गुदमरलेला श्वास मोकळा केला. पवार म्हणाले, विंचरणा नदीची साफसफाई केल्यानंतर येत्या काळात सुशोभीकरणाचेही काम हाती घेण्यात येणार आहे. प्रत्येक नदी ही गंगेसमान असते. त्यामुळे तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि या नद्या स्वच्छ ठेवणे म्हणजेच आपले कर्तव्य पार पाडण्यासारखे आहे. आपणच अक्षम्य दुर्लक्ष करत नद्या प्रदूषित केल्या आहेत.या नद्यांना पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यासाठी अनेक जणांची साथ मिळाली, याबाबत मी सर्वांचा आभारी आहे, असे ते म्हणाले. यावेळी पांडुरंगशास्त्री देवा, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदाताई पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोठारी, ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, माजी सभापती सुभाष आव्हाड, शिल्पकार प्रमोद कांबळे, उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, नगरसेवक दिगंबर चव्हाण, पवन राळेभात आदी उपस्थित होते.