तेलंगणा राज्यातील २२ मजूर वा-यावर; सात दिवसापासून प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 01:53 PM2020-05-09T13:53:27+5:302020-05-09T13:54:23+5:30
केडगाव परिसरातील मराठा नगरमध्ये मागील सात दिवसांपासून तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यातील २२ परप्रांतीय मजूर अडकले आहेत. परंतु संपर्क करुनही नगर तालुका प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. यामुळे या मजुरांपुढे गावी जायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केडगाव : केडगाव परिसरातील मराठा नगरमध्ये मागील सात दिवसांपासून तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यातील २२ परप्रांतीय मजूर अडकले आहेत. परंतु संपर्क करुनही नगर तालुका प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. यामुळे या मजुरांपुढे गावी जायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून रविवारी (३ मे) तेलंगणा राज्यातील २२ मजूर पायी निघाले असल्याची माहिती देशपातळीवरील सामाजिक क्षेत्रात काम करणा-या संघटनेच्या स्थानिक पदाधिका-यांना समजली. त्यांनी या मजुरांच्या निवा-याची व भोजनाची सोय केली. केडगाव परिसरातील मराठा नगर येथे सध्या हे मजूर राहत आहेत. या कुटुंबियांना जेवणाचा शिधा दिला जात आहे. पालिकेच्या गळती होणाºया जलवाहिनीतून ते तहान भागवत आहेत. या कुटंबियांना मदत करणा-या स्थानिक कार्यकर्त्यांनी या कुटुंबियांना मदतीसाठी नगर तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. शेवटी नाईलाजास्तव तहसीलदारांना फोन केला तर त्यांनीही तो उचलला नाही. मेसेज टाकला तरी प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी शहर विभागाचे पोलीस अधिका-यांशी संपर्क करण्यात आला. त्यांनी मदतीसाठी पाठवतो असे सांगितले. परंतू सायंकाळपर्यंत कुणीही आले नव्हते.
भाषा समजत नसल्याने अडचणी
या मजुरांच्या कुटुंबांशी संपर्क साधला असता त्यांना मराठी व हिंदी या दोन्हीही भाषा समजत नाही. भाषेची अडचण असल्याने त्यांचे नोंदणी फॉर्म भरण्यापासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून मदत मिळत नसल्याने तेलंगणा राज्यातील मजूर हतबल झाले आहेत. मजूर व सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींकडून प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या भागातील नागरिक तसेच सामाजिक संघटनेच्या तरुणांकडून या मजूर कुटुंबियांना शिधा व आहार पुरविला जात आहे. प्रशासनाकडून कधी प्रतिसाद मिळतो? याकडे मजुरांचे डोळे लागले आहेत.