संपात २२ हजार ग्रामसेवक सहभागी होणार : एकनाथ ढाकणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:05 AM2018-07-31T11:05:45+5:302018-07-31T11:05:50+5:30
राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात २२ हजार ग्रामविकास अधिका-यांसह ग्रामसेवक सहभागी होणार आहेत
अहमदनगर : राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात २२ हजार ग्रामविकास अधिका-यांसह ग्रामसेवक सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
सहाव्या वेतनातील त्रुटीत सुधारणा, सातवा वेतन आयोग लागू करणे, अंशदायी जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचा-यांच्या संघटनांनी येत्या ७ ते ९ या काळात संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपात राज्यातील ग्रामसेवक सहभागी होणार आहेत. ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष ढाकणे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे. सन २०१७ मध्ये जानेवारी व जुलै या महिन्यांत झालेल्या संपातील मागण्यांवर तोडगा निघालेला नाही. सरकारी कर्मचा-यांनी डिसेंबर २०१७ मध्ये मंत्रालयावर महामोर्चा काढला. याशिवाय यावर्षी १२ जून रोजी निदर्शने केली. परंतु शासनाकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे संपात सहभागी होण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
या आहेत मागण्या
जुनी पेन्शन योजना, सातवा वेतन आयोग लागू करावा, खासगीकरण व कंत्राटी धोरण रद्द करावे, कंत्राटी कर्मचा-यांना किमान वेतन २६ हजार रुपये द्यावे, महागाईभत्त्याची थकबाकी त्वरित अदा करावी, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, पाच दिवसांचा आठवडा करावा, ग्रामसेवकपदासाठी शैक्षणिक अर्हता पदवीधर करावी, आदी मागण्या संपात मांडण्यात येणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.