दंश केलेला साप महिलेच्या कपड्यात २४ तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:49 PM2018-07-04T12:49:29+5:302018-07-04T12:50:12+5:30
सापाने दंश केल्याने आदिवासी महिला रुग्णालयात दाखल झाली. रुग्णालयात डॉक्टरांनी उपचार सुरू केले.
मच्छिंद्र देशमुख
कोतूळ : सापाने दंश केल्याने आदिवासी महिला रुग्णालयात दाखल झाली. रुग्णालयात डॉक्टरांनी उपचार सुरू केले. परंतु २४ तास उलटल्यानंतर रुग्णालयात तिच्या कपड्यातच साप आढळून आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे ‘त्या’ महिलेचे प्राण वाचले. ही घटना संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर जवळील मामेखेल येथे घडली.
मामेखेल गावातील इंदुबाई भास्कर करवंदे या १३ जून रोजी आपल्या नातेवाईकांकडे आंबेरसासाठी गेल्या. रात्री उशिरा त्या मामेखेलला परतल्या. मात्र १४ जूनला पहाटे चार वाजता त्यांच्या पोटात दुखायला लागले. श्वास मंदावला म्हणून दुचाकीने अकोले येथील भांडकोळी हॉस्पिटलमध्ये पहाटे पाच वाजता दाखल केले. आंबेरस खाल्ल्याने पोट दुखते असे सांगितले. मात्र डॉ.भांडकोळी यांनी रुग्णाची लक्षणे पाहून विषारी साप चावल्याचे सांगितले. मात्र रूग्णाचे नातेवाईक ते मान्य करेनात. रूग्ण बेशुद्ध पडल्याने त्याला कृत्रिम श्वास सुरू केला. मन्यार सापाच्या दंशाचे उपचार सुरू केले. डॉक्टरांनी घरात सापाचा शोध घ्यायला सांगितले. घरालगत एक कवड्या साप सापडला़ तो नातेवाईकांनी दाखविला. डॉक्टरांनी तो बिनविषारी असल्याचे सांगितले. रविवारी १ जुलैला रूग्ण पूर्ण बरा झाल्याने त्यांना डॉक्टरांनी घरी सोडले.
१५ तासांनी महिला आली शुद्धीवर
मन्यारच्या लक्षणानुसार उपचार सुरू ठेवल्याने १५ तासांनी रूग्ण जरा शुद्धीवर आली. १५ जूनला पहाटे चार वाजता रुग्णाच्या मानेवर व तोंडावर अडीच ते तीन फुटाचा साप वळवळू लागल्याने रुग्णाने हातपाय आपटायला सुरुवात केली. हॉस्पिटलमधील इतर रुग्णांच्या ही बाब लक्षात आली. साप दिसल्याने रुग्णालयात एकच गोंधळ झाला. इतर रुग्ण भितीमुळे मोठमोठ्याने आरडाओरड करु लागले. प्रसंगावधान राखून डॉ. भांडकोळी यांनी अकोले येथील सर्पमित्र धनंजय मोहिते यांना बोलावून मन्यार जातीचा साप पकडला. चक्क चोवीस तास हा विषारी साप महिलेच्या अंगावरील नेसत्या कपड्यात बसून होता. मात्र डॉक्टरांच्या सजगपणामुळे इंदुबाईचे प्राण वाचले हे नक्की.
माझ्याकडे पेशंट आंबेरस खाल्ल्याने पोट दुखते म्हणून आले. मात्र श्वास बंद होत चालला होता. पेशंट बेशुद्ध होते. रक्ताभिसरण संस्था कमकुवत झाली होती. यावरून ही मन्यार दंशाची लक्षणे दिसू लागली. उपचार सुरू ठेवले. चोवीस तासांनी मन्यार साप रुग्णाच्या कपड्यातून बाहेर आला. त्याला सर्प मित्रांनी पकडून सोडून दिले. साप चावल्याचे निदान झाल्याने योग्य उपचार करता आले. -डॉ. एम. के. भांडकोळी, अकोले.