२४१ जवानांनी घेतली देशसेवेची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:26 AM2021-09-17T04:26:04+5:302021-09-17T04:26:04+5:30
अहमदनगर : मेकॅनाईज्ड इन्फन्ट्री रेजिमेंट सेंटरमधील (एमआयआरसी) २४१ जवानांनी ३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून गुरुवारी देशसेवेची शपथ घेत ...
अहमदनगर : मेकॅनाईज्ड इन्फन्ट्री रेजिमेंट सेंटरमधील (एमआयआरसी) २४१ जवानांनी ३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून गुरुवारी देशसेवेची शपथ घेत सैन्यात प्रवेश केला.
एमआयआरसी येथील अखौरा ड्रिल मैदानात गुरुवारी या जवानांनी शानदार संचलन केले. त्यानंतर लष्करात दाखल होणाऱ्या जवानांचा शपथग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. शानदार संचलन करीत जवानांनी देशसेवेची शपथ घेतली.
जवानांनी पहिली सलामी मेजर जनरल पद्मसिंग शेखावत यांना दिली. शेखावत यांनी परेडचे निरीक्षण केले. एमआयआरसी संस्थेने लष्करासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना प्रदान करण्यात आलेले निशाण (ध्वज) मैदानावर आणताच सर्वांनी उभे राहून या ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर धर्मगुरूंनी जवानांना कर्तव्यासाठी निष्ठा व समर्पणाची शपथ दिली. हा शपथग्रहण सोहळा झाल्यानंतर जवानांनी शानदार संचलन केले.
'देशाचे रक्षण करताना कितीही अवघड परिस्थिती आली तरी, त्या परिस्थितीचा निर्भयपणे सामना करतानाच, देशाची एकता आणि अखंडता यांचे रक्षण करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये शिस्त, सैनिकी आचरण, सैनिक धर्म हे प्रामाणिकपणे जपतानाच एक जबाबदार नागरिक बनून या देशाचे रक्षण करा,’ असे सांगत शेखावत यांनी जवानांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
..................
पंकज यादव सर्वोत्कृष्ट रिक्रूट
प्रशिक्षण काळात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रिक्रूट पंकज यादव यास 'जनरल सुंदरजी गोल्ड मेडल' देऊन गौरविण्यात आले. रिक्रूट दयाराम गुर्जर याला 'जनरल के. एल. डिसूजा सिल्व्हर मेडल' आणि रिक्रूट आशिक राय याला 'पंकज जोशी कांस्यपदक' देऊन सन्मानित करण्यात आले.
--------------
फोटो - १६एमआयआरसी
एमआयआरसी येथे २४१ जवानांनी ३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून गुरुवारी देशसेवेची शपथ घेत सैन्यात प्रवेश केला.