२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:15 AM2021-06-11T04:15:45+5:302021-06-11T04:15:45+5:30
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांना विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये किमान ...
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांना विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. निकषात बसणाऱ्या नजीकच्या शाळेमध्ये या प्रक्रियेतून पूर्व प्राथमिक व पहिलीसाठी प्रवेश दिले जातात. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळा मोफत शिक्षण देते. त्या बदल्यात शासन संबंधित शाळेला प्रतिपूर्ती रक्कम अदा करते.
नगर जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी २१ जानेवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीमध्ये शाळांनी नोंदणी व ४०२ शाळा पात्र ठरल्या. या नोंदणी केलेल्या शाळांमध्ये पालकांनी ३ मार्च ते २१ मार्चदरम्यान ऑनलाइन अर्ज भरले. नगर जिल्ह्यात एकूण ४०२ शाळांमध्ये ३०१३ जागांसाठी ४८२५ अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची राज्यस्तरावरून ७ एप्रिल रोजी लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीमध्ये २७५३ अर्जांची निवड झाली. आता यात निवड झालेल्या अर्जांसाठी ११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.
उर्वरित अर्ज प्रतीक्षा यादीत असून त्यांचे प्रवेश पुढच्या टप्प्यात होणार आहेत.
कोरोनामुळे सद्य:स्थितीत पडताळणी केंद्रांवर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे फक्त या शैक्षणिक वर्षासाठी शाळास्तरावर कागदपत्रांची पडताळणी करून व संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्याबाबत राज्यस्तरावर सूचना आहेत. त्यानुसार शाळांनी प्रवेश करून घ्यावेत, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
लॉटरीद्वारे निवड झालेल्या यादीतील विद्यार्थ्यांना संबंधित शाळांनी प्रवेशाकरिता २० दिवसांचा कालावधी द्यावा, ११ जूनपासून शाळांनी पालकांना प्रवेशाकरिता पोर्टलवर तारीख द्यावी व प्रवेशाची कार्यवाही करावी. पालकांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन शाळेत प्रवेश निश्चित करावा. ऑनलाइन कागदपत्रे सादर करूनही प्रवेश निश्चित करता येईल. सध्या प्रवेश तात्पुरता स्वरूपाचा असेल. पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर प्रवेश अंतिम होईल.
-------------
प्रतीक्षा यादीतील प्रवेश पुढच्या टप्प्यात
जिल्ह्यात मोफत प्रवेशाच्या एकूण ३०१३ जागा आहेत. पहिल्या टप्प्यात लॉटरी अंतर्गत २७५३ जागा भरल्या जातील. उर्वरित अर्ज प्रतीक्षा यादीत असून त्यांचे प्रवेश पुढील टप्प्यात होतील, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
--------------
चुकीचे अंतर दाखविल्यास कारवाई
पालकांनी अर्जामध्ये शाळा ते घर याबाबत चुकीचा अंतर दाखविल्यास किंवा अर्जात चुकीचे कागदपत्रे सादर केल्यास पडताळणी समितीकडून संबंधित पालकांवर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.