जिल्हा बँक-सोसायट्यांच्या कर्ज वसुलीत २५० कोटींची तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:56 AM2021-02-20T04:56:02+5:302021-02-20T04:56:02+5:30

श्रीगोंदा : जिल्हा सहकारी बँक ही सोसायट्यांना दिलेल्या कर्जाची वसुली करताना मुद्दल मुद्दलमध्ये आणि व्याज व्याजात जमा करीत नाही. ...

250 crore difference in loan recovery of district bank societies | जिल्हा बँक-सोसायट्यांच्या कर्ज वसुलीत २५० कोटींची तफावत

जिल्हा बँक-सोसायट्यांच्या कर्ज वसुलीत २५० कोटींची तफावत

श्रीगोंदा : जिल्हा सहकारी बँक ही सोसायट्यांना दिलेल्या कर्जाची वसुली करताना मुद्दल मुद्दलमध्ये आणि व्याज व्याजात जमा करीत नाही. त्यामुळे बँक आणि सोसायट्या यांच्यामधील कर्ज वसुलीची अनिष्ट तफावत वाढत गेली आहे. सद्या ही अनिष्ट तफावत २५० कोटी रुपये आहे. ती कमी करण्यासाठी बँकेने दरवर्षी येणे रकमांची तरतूद करणे आवश्यक आहे, अशी मागणी श्रीगोंदा तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी केली आहे.

दरेकर म्हणाले, जिल्हा सहकारी बँकेच्या १ हजार ३८९ सोसायट्या सभासद आहेत. आतापर्यंत २५० कोटींची अनिष्ट तफावत विभागली तर प्रत्येक सोसायटीच्या माथ्यावर सरासरी १८ लाखांची अनिष्ट तफावत दिसते. प्रत्यक्षात हे १८ लाख सोसायटीकडे नसतातच. परंतु, जिल्हा बँक सोसायटीकडून न जमा झालेले व्याजही मुद्दलाच्या रकमेतून जमा करून घेतात. त्यामुळे सोसायट्यांकडे प्रत्यक्ष असणाऱ्या मुद्दलपेक्षा जास्त मुद्दल येणे दिसते आणि त्यावर बँकेचे व्याजाचे मीटर सुरूच असते. यामुळे प्रत्येक सोसायटीवर घेतलेल्या कर्जाच्या वीस टक्के अनिष्ट तफावत दिसते. ही तफावत सोसायट्या भरूच शकत नाहीत. कारण प्रत्यक्षात ती रक्कम सोसायट्यांकडे नसतेच.

जिल्हा बँकेने एखाद्या सोसायटीचे मुद्दल आणि व्याज ६० टक्के वसूल केले असेल तर ६० टक्के मुद्दल मुद्दलमध्ये जमा करून घ्यावे आणि त्यावरील व्याज व्याजात जमा करून घ्यावे. यामुळे त्या सोसायटीकडे फक्त ४० टक्के मुद्दल बाकी राहील व त्यावरच व्याज आकारणी होऊन ती रक्कम सभासदाकडून येताच बँकेला जमा होईल. या व्यवहारात सोसायटीला आर्थिक फटका बसणार नाही.

----

संचालक कारखानदारांचाच विचार करतात..

जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दरवर्षी दिले जाणारे १५ कोटींचे रिबेट न देता अनिष्ट तफावत कमी करण्यासाठी ते येणे तरतुदीत दाखवावे. म्हणजे काही वर्षांनी ही अनिष्ट तफावत दूर होईल. १ हजार ३८९ सोसायट्यांना अडचणीत आणून जिल्हा बँक ४० कोटींचा नफा कशासाठी दाखविते याचेही कोडे उलगडत नाही. संचालक बँकेचा आणि सोसायट्यांच्या हिताचा विचार न करता आपापल्या साखर कारखान्याच्या हिताचा विचार करत आहेत, असा आरोप दरेकर यांनी केला.

Web Title: 250 crore difference in loan recovery of district bank societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.