जामिनावर सुटलेले २६ कैदी झाले फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 05:54 PM2018-12-27T17:54:38+5:302018-12-27T17:56:08+5:30
खून, अत्याचार, दरोडा, जबर मारहाण आदी गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेले जिल्ह्यातील २६ आरोपी जामिनावर बाहेर
अरुण वाघमोडे
अहमदनगर : खून, अत्याचार, दरोडा, जबर मारहाण आदी गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेले जिल्ह्यातील २६ आरोपी जामिनावर बाहेर
आल्यानंतर परत कारागृहात परतलेच नाहीत़ यातील बहुतांशी जण पुन्हा गुन्हेगारीकडे वळले आहेत़ २६ पैकी काही आरोपी २० ते २२ वर्षांपासून फरार आहेत.
फरार झालेल्या कैद्यांसंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी पोलीस पथकांवर सोपविण्यात आली आहे. हे कैदी मात्र कुणालाच सापडत नाहीत. फरार झालेले कैदी हे येरवडा, पैठण, नाशिक, कोल्हापूर या कारागृहात शिक्षा भोगत होते़ न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर आरोपींना कारागृह प्रशासनाकडून संचित (फर्लो) तर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अभिवचन (पॅरोल) रजा दिली जाते. संचित रजा १४ तर अभिवचन रजा २१ दिवसांची असते़ ही रजा मंजूर करून बाहेर पडल्यानंतर अनेक कैदी कारागृहात जाऊन आपल्या शिक्षेचा कार्यकाल पूर्ण करतात़ गुन्हेगारी प्रवृत्तीचे मात्र फरार होऊन पुन्हा आपल्या कारवाया सुरू करतात़ जिल्ह्यातील फरार झालेल्या २६ पैकी अनेक जण जन्मठेपेची शिक्षा झालेले असून, काही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.
हे आहेत फरार
गोरक्षनाथ बाबूराव शिंगोटे, रामकिसन उत्तम साठे, सय्यद साजीद रोशनमिया, किरण गोरख शेळके, संतोष बाबूराव सोनवणे, बाबाजी बाबूराव सोनवणे, प्रमोद काळू केंद्रळे, सतीश दिलीप खराडे, शौकात अहमदखान पठाण, उमाजी सुखदेव झांबरे, जितेंद्र सहदेव जगधने, नितीन बबन शिंदे, अंबादास तुकाराम पवार, मंगलसिंग उर्फ मंगेश चतुरसिंग ओनावले, आंबा जगदाळे, शाम केशव मोरे, हबीब सय्यद, चरणसिंग रावसाहेब जाधव, आनंदा रामदास शिरसाठ, सतीश गणपत धिवर, शेख अक्रम, राजेंद्र गणेश धिनोर, शेख एजाज गुलाब, धनू अशोक काळे, रिजवान शेख.
पपड्याही सुटला होता पॅरोलवर
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे १९ आॅगस्ट रोजी ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकून एका सराफाचा खून करणारा कुख्यात
गुन्हेगार पपड्या काळे याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे़ तो नाशिक कारागृहात होता़ मुलाच्या लग्नासाठी मात्र त्याला पॅरोल रजा मंजूर झाल्याने तो जेलबाहेर आला होता़ जामिनावर बाहेर
आलेला पपड्या फरार झाला आणि त्याने आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या़
विविध गुन्ह्यात शिक्षा झालेल्या आरोपींना कायदेशीर अधिकारानुसार जामिनावर रजा मंजूर होते़ शिक्षा झालेले काही जण मात्र सराईत व गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात़ त्यामुळे ते पुन्हा कारागृहात न जाता पसार होतात़ सराईत गुन्हेगारांना रजा मंजूर करताना त्यांची पार्श्वभूमी पाहणे व स्थानिक पोलिसांच्या अहवालाचे अवलोकन करणे महत्त्वाचे असते़ एखाद्या सराईत गुन्हेगाराला रजा मंजूर झाली तर पोलिसांच्या निगराणीतच त्याने रजा पूर्ण करण्याची अट घालणे गरजेचे आहे. - रंजनकुमार शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक