२६ विद्यार्थ्यांना विषबाधा
By Admin | Published: February 11, 2015 11:19 PM2015-02-11T23:19:51+5:302015-02-12T14:12:46+5:30
तालुक्यातील चोंभूत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात माथेफिरूने विषारी औषध टाकल्याने या शाळेतील २६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. दरम्यान या विद्यार्थ्यांवर अळकुटी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे़
पारनेर : तालुक्यातील चोंभूत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात माथेफिरूने विषारी औषध टाकल्याने या शाळेतील २६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. दरम्यान या विद्यार्थ्यांवर अळकुटी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे़
पारनेर तालुक्यातील अळकुटीजवळ चोंभूत गाव आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत बुधवारी सकाळी शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाणी भरीत असताना पाण्याला वेगळाच वास येत असल्याचे मुख्याध्यापिका नंदा ठुबे व कुसुम ठुबे यांच्या लक्षात आले. लगेच भानुदास ठाणगे, शमशुद्दीन सय्यद, शिवराम डेरे या शिक्षकांनी पाण्याच्या टाकीची पाहणी केली असता विषारी औषधाची बाटली पाण्यात आढळून आली. व पाण्यावर तेलासारखे तवंग दिसले. याप्रकाराने शिक्षक हादरून गेले. त्या टाकीतील पाणी कोणी प्यायले का, अशी विचारणा शिक्षक करीत असतानाच अनेक मुलांना उलट्या, मळमळ व पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिक्षकांनी तातडीने रुग्णवाहिका व इतर वाहने घेऊन विद्यार्थ्यांना अळकुटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. शिवाजी जाधव, डॉ. कोते यांनी तातडीने उपचार सुरू केले़ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या घटनेचे वृत्त कळताच पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, सदस्य डॉ. भास्कर शिरोळे, मधुकर उचाळे, गटशिक्षणाधिकारी के. एल. पटारे, विस्तार अधिकारी विनेश लाळगे यांनी तातडीने आरोग्ययंत्रणा व इतर यंत्रणांना सतर्क करून विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मदत पथक तयार केले. या प्रकारामुळे चोंभूतसह तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात भानुदास ठाणगे यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी पाण्यात विषप्रयोग केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार्या माथेफिरुचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी सभापती गणेश शेळके यांनी केली आहे.
विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची नावे
अक्षदा गणेश बनसोडे,पूनम जालिंदर गाडेकर,समीक्षा संदीप पाडेकर,रोशन सुभाष माळी,ओंकार सोमनाथ कोल्हे,मोहन गजानन कोल्हे,आरती काशिनाथ माळी,गौरव पवन जाधव,अजिंक्य बाळू जमदाडे,वैभव मच्छिंद्र जमदाडे,ओंकार बबन जाधव,साक्षी सुनील जमदाडे,दौलत सोम कोळेकर,विशाल नवनाथ शेलार,संकेत संतोष खाडे,चैतन्य बाबासाहेब म्हस्के,आकाश उत्तम भालेराव,श्रेयस बबन कोल्हे,वैभव सोमनाथ कोल्हे,साहिल अंकुश गांडाळ,साहिल दिनकर पारखे,जय बाबुराव देवाडे,रोहित बाबाजी म्हस्के,पल्लवी संतोष भालेराव,सार्थक रमेश माळी,लखन बाळू जाधव़