नगर तालुक्यात ३ ग्रामपंचायती पेपरलेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 10:49 AM2018-09-09T10:49:42+5:302018-09-09T10:51:11+5:30
डिजीटल तंत्रज्ञानामुळे आता प्रशासकीय कारभार पेपरलेस करण्यावर शासनाचा भर आहे.
योगेश गुंड
केडगाव : डिजीटल तंत्रज्ञानामुळे आता प्रशासकीय कारभार पेपरलेस करण्यावर शासनाचा भर आहे. पंरतु अद्ययावत सुविधा देऊनही याचा उपयोग फार कमी ग्रामपंचायतीत मध्ये होताना दिसतो. माञ नगर तालुक्यातील अकोळनेर , सारोळा कासार , देऊळगाव सिध्दी ग्रामपंचायतीने दैनंदिन कामकाजामध्ये ई - ग्राम सॉफ्ट प्रणालीचा प्रभावी वापर करीत तीन ग्रामपंचायतीने पेपरलेस होण्याचा मान पटकाविला आहे. त्यामुळे या गावात ३३ प्रकारचे दाखले आता आॅनलाईन मिळणार आहेत.
या योजनेचा शुभारंभ गटविकास अधिकारी अलका शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आला. या ग्रामपंचायतीने आपले सरकार योजनेतील ई - ग्राम सॉफ्ट संगणक प्रणालीचा प्रभावीपणे करण्यास सुरवात केली आहे. या माध्यमातून ३३ प्रकारचे विविध दाखले ग्रामपंचायतीमधून आॅनलाईन मिळणार आहेत. आर्थिक व्यवहार, तसेच विविध प्रकारच्या नोंदी संगणकावर केल्या जाणार आहेत. ग्रामपंचायत कारभार आणखी पारदर्शक व स्वच्छ होणार आहे. ग्रामस्थांनी जलद व गतीमान सेवा मिळणार असल्याने लोकाचा श्रम व वेळ वाचणार आहे. ग्रामपंचायत पेपरलेस होण्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रंशात शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सरकार सेवा केंद्र समन्वयक विठ्ठल आव्हाड, विजय पठारे, विलास चौरे यांनी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत पेपर लेस झाल्यामुळे ग्राम विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, ठकाराम तुपे, सुवर्णा लेंडे यांनी अभिनंदन केले. ग्रामसेवक तुकाराम जाधव, अशोक बोरुडे, संजय वाघ हे यावेळी उपस्थित होते.
ग्रामस्थांना होणार फायदा
गावक-यांना जलद सुविधा आणि पारदर्शक कारभारासाठी ई ग्राम सॉफ्ट प्रणाली फायदेशीर ठरणार आहे. या ग्रामपंचायती सारखाच कारभार इतर ग्रामपंचायतीने वापर करावा. - अलका शिरसाठ, गटाविकास अधिकारी, नगर तालुका