अकोेलेतील सोंगांच्या यात्रेत ३ लाख भाविकांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:02 AM2019-04-08T11:02:40+5:302019-04-08T11:03:19+5:30
संगणकाच्या युगात चिमुकले वाचन संस्कृतीपासून दूर जात आहेत. असे असतानाही लिंगदेव (ता. अकोले) येथे ‘सोंगांची आखाडी’, ‘बोहडा’ ही लोककला संस्कृती आजही जपली जात आहे.
अकोले : संगणकाच्या युगात चिमुकले वाचन संस्कृतीपासून दूर जात आहेत. असे असतानाही लिंगदेव (ता. अकोले) येथे ‘सोंगांची आखाडी’, ‘बोहडा’ ही लोककला संस्कृती आजही जपली जात आहे. गुढीपाडव्याला ‘लिंगेश्वराची’ सोंगांची यात्रा पुरोगामी विचाराची कास धरीत उत्साहात पार पडली. जवळपास तीन लाख भाविकांनी यात्रेला हजेरी लावली.
दिवसरात्र देणगीच्या ओघामुळे यंदा गुढीपाडव्याला ९ लाख ५० हजार रुपये लिंगेश्वर संस्थानच्या तिजोरीत जमा झाले आहेत. भाऊसाहेब घोमल यांनी ३१ हजार रुपये तर अभियंता अमोल फापाळे यांनी २५ हजार रुपये अशी यंदाची सर्वाधिक देणगी दिली आहे. शनिवारी पहाटे लिंगेश्वर महादेवाची महापूजा, महाआरती झाल्यावर दर्शनासाठी मंदिरासमोर रांगा लागल्या. रात्रभर दर्शन रांग होती. ऋतुमान उकलविधी, शोभायात्रा व लेझीम स्पर्धा पार पडल्या.
मकडी- डोरेमॉन, निंज्या -हातोडी ही नावे लहान मुलांच्या तोंडातील परवलीचे शब्द होत. त्यामुळे पौराणिक नावे कालबाह्य होताना दिसत आहेत.
कथा, पुस्तक, ग्रंथापुरत्याच सीमित होत आहेत. अंगणात ओट्यावरती चांदण्याच्या प्रकाशात गोष्टी सांगणारे आणि ऐकणारे आता दिसत नाहीत. अशा काळात पुराण-इतिहासातील पात्रे जिवंत ठेवण्याचे काम आखाडी लोककलेतून केले जात आहे. आखाडी यात्रेत पुरोगामी विचारांची सांगड घालून डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, पोलीस, सैन्यदलातील जवान आदींसह शेतात काबाडकष्ट करणारे असे उच्चशिक्षित व अल्पशिक्षित गावकरी अनादी कालापासून चालत आलेली परंपरा जोपासत आहेत.