३ हजार जणांना शस्त्र बाळगण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:21 AM2019-03-13T11:21:21+5:302019-03-13T11:21:32+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात परवानाधारक शस्त्रे जवळ बाळगून फिरण्यास, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे नेण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे

3 thousand people were not allowed to take weapons | ३ हजार जणांना शस्त्र बाळगण्यास मनाई

३ हजार जणांना शस्त्र बाळगण्यास मनाई

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात परवानाधारक शस्त्रे जवळ बाळगून फिरण्यास, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे नेण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेश जारी केले असून ते निकालापर्यंत म्हणजे २३ मेपर्यंत लागू राहणार आहेत. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत किंवा जे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उपद्रवी आहेत, अशा लोकांना आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात शस्त्रे जमा करावी लागणार आहेत.
जिल्ह्यात शिर्डी व अहमदनगर असे दोन लोकसभा मतदारसंघ असून येथे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आवश्यक असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ अन्वये प्राप्त अधिकारान्वये हे आदेश जारी करण्यात आले आहेत. निवडणूक काळात शस्त्र बाळगणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकूण ३ हजार २६९ जणांकडे शस्त्र परवाना आहे. त्यात शिर्डी मतदारसंघात १२८२, तर अहमदनगर मतदारसंघात १९८७ जणांकडे शस्त्रे आहेत. शहरासह ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण मोठे आहे. आतापर्यंत अनेक गुन्ह्यांत गावठी कट्टे, पिस्तूल अशा शस्त्रांचा वापर झाला असून निवडणूक काळात तर या गुन्ह्यांचे प्रमाण आणखी वाढते. याच पार्श्वभूमीवर ही शस्त्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या परवानाधारकावर गंभीर गुन्हा दाखल आहे किंवा गंभीर गुन्ह्यातून ज्यांची नुकतीच जामिनावर सुटका झालेली आहे किंवा अशी राजकीय व्यक्ती ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा व्यक्तींना संबंधित पोलीस ठाण्यात शस्त्रे जमा करावी लागणार आहेत. उर्वरित शस्त्रधारकांना निवडणूक काळात शस्त्रे जवळ बाळगण्यास, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे नेण्यास प्रशासनाने मनाई केलेली आहे.

Web Title: 3 thousand people were not allowed to take weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.