अमरधामात आणखी ३० जणांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:21 AM2021-04-11T04:21:03+5:302021-04-11T04:21:03+5:30

अहमदनगर : येथील नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत शनिवारी दिवसभरात मृतदेहांची रांग लागली होती. दोन दिवसांत शंभरपेक्षा जास्त जणांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर ...

30 more cremated at Amardham | अमरधामात आणखी ३० जणांवर अंत्यसंस्कार

अमरधामात आणखी ३० जणांवर अंत्यसंस्कार

अहमदनगर : येथील नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत शनिवारी दिवसभरात मृतदेहांची रांग लागली होती. दोन दिवसांत शंभरपेक्षा जास्त जणांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर शनिवारीही ३० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामध्ये २० जणांवर विद्युतदाहिनीत, तर चितेवर १० जणांना अग्नी देण्यात आला. गेल्या सहा दिवसांपासून मिनी लॉकडाऊन असला तरी दररोज बाधित होणाऱ्यांचे प्रमाण दोन हजारांवर आहे. शनिवारी २,२१० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर शासकीय आकडेवारीप्रमाणे ९ जणांचा मृत्यू झाला. सध्या १२ हजार ६१ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक लाखांवर गेली आहे. शनिवारी जिल्हा रुग्णालयात ९६०, खासगी प्रयोगशाळेत ४८४, अँटिजन चाचणीत ७६६ रुग्ण बाधित आढळून आल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.

कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी १९, गुरुवारी ४५, शुक्रवारी ४५, अशा तीन दिवसांत कोरोनाने शंभरांवर मृत्यू झालेल्यांवर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी सकाळपासूनच ३० मयतांची नोंद झाली होती. त्यापैकी दिवसभरात २० जणांवर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उर्वरित १० जणांवर, तसेच सायंकाळनंतर आलेल्या मयतांवर ओट्याच्या आजूबाजूला सरण रचून लाकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दररोज होणाऱ्या या अंत्यसंस्कारांमुळे सर्वांचेच मन सुन्न झाले आहे. हे मृत्यूचे तांडव आणखी किती दिवस सुरू राहणार? या प्रश्नाने चिंता वाढली आहे.

---------

नगर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर हॉट स्पॉट

जिल्ह्यात शनिवारी २,२१० कोरोनाबाधित आढळून आले. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण नगर शहरात (५३४), राहाता (१८३), संगमनेर (१६३), श्रीरामपूर (१६२),कर्जत (१५०), राहुरी (१४०), नगर ग्रामीण (११५), अकोले (१११), शेवगाव (१०७), पारनेर (१०५), कोपरगाव (८७), नेवासा (८७), जामखेड (८१), पाथर्डी (६०), श्रीगोंदा (५१), भिंगार (५०), मिलिटरी हॉस्पिटल (१४), इतर जिल्हा (१०), इतर राज्य (०) येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यात नगर शहर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने हे तालुके हॉटस्पॉट ठरले आहेत.

----------------

कोरोनाची स्थिती

एकूण रुग्ण- १,१३,६३३

बरे झालेले- १,००,२९०

उपचार सुरू- १२,०६१

मृत्यू- १,२८२

--------------

Web Title: 30 more cremated at Amardham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.