शेवगावमध्ये मास्क न लावता फिरणा-या तब्बल ३० जणांना दंड; दोन दुकानदारांवरही कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:17 AM2020-06-10T11:17:10+5:302020-06-10T11:17:42+5:30
तहसीलदार अर्चना पागिरे यांनी मंगळवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर उतरत विना मास्क फिरणा-या, दुचाकीवर डबलशीट फिरणाº-यांवर कारवाई केली. तब्बल ३० जणांना दंड ठोठावला. तर उशिरापर्यंत दोन दुकाने उघडी ठेवल्याने संबंधित दुकानदारांकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शेवगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी मंगळवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर उतरत विना मास्क फिरणा-या, दुचाकीवर डबलशीट फिरणाº-यांवर कारवाई केली. तब्बल ३० जणांना दंड ठोठावला. तर उशिरापर्यंत दोन दुकाने उघडी ठेवल्याने संबंधित दुकानदारांकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दोन तास रस्त्यावर उभा राहून बेशिस्त वाहनांना लगाम लावत शिस्तीचे धडे दिले.
तहसीलदार अर्चना पागिरे यांनी केलेल्या अनोख्या कारवाईची सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे. नागरिकांनी कारवाईचे स्वागत केले आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पागिरे शहरात आल्या होत्या. त्यावेळी अनेक लोक तोंडाला मास्क न लावता दुचाकीवरुन फिरतांना दिसून आले. तर चार चाकी वाहनातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवास करताना शासनाने घालून दिलेले नियम धाब्यावर बसवून लोक प्रवास करीत असल्याचे लक्षात आले.
यानंतर पागिरे यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ आपल्या पथकासह तात्काळ दाखल झाले. महसूल, पोलीस, नगरपरिषद यांच्या संयुक्त पथकाने धडाकेबाज कारवाई करुन अनेकांना शिस्तीचे धडे दिले. तहसीलदार अर्चना पागिरे यांची काही दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथून शेवगाव येथे तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे.