शिष्यवृत्ती प्रशिक्षणासाठी होणार ३०० विद्यार्थ्यांची निवड, १ डिसेंबरला परीक्षा; शिष्यवृत्ती निकाल वाढीसाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न
By चंद्रकांत शेळके | Published: November 27, 2023 08:20 PM2023-11-27T20:20:18+5:302023-11-27T20:20:47+5:30
जिल्हा परिषदेसह सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील विद्यार्थी यात सहभाग नोंदवतात. परंतु असे असतानाही या परीक्षेचा निकाल फारच कमी लागतो.
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि आठवीच्या (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादी यावेत यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग विशेष प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने आता सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यातून निवडक ३०० विद्यार्थी निवडून त्यांच्यासाठी ॲानलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी म्हणून राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. जिल्हा परिषदेसह सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील विद्यार्थी यात सहभाग नोंदवतात. परंतु असे असतानाही या परीक्षेचा निकाल फारच कमी लागतो.
मागील वर्षी जिल्ह्याचा पाचवीचा निकाल २६ टक्के, तर आठवीचा निकाल १६.८७ टक्के एवढाच होता. त्यामुळे या निकालात वाढ व्हावी, तसेच राज्याच्या गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा समावेश व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जिल्ह्यात अनेकदा शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आल्या. शिवाय शालेय स्तरावर जादा तासही घेण्यात आले. त्याच धर्तीवर आता निवडक ३०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची विशेष तयारी करून घेतली जाणार आहे. पुढील वर्षीची शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. त्या परीक्षेच्या दृष्टीने हे नियोजन सुरू आहे.
अशी असेल विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया
१ डिसेंबर २०२३ रोजी तिसरी ते आठवीपर्यंतच्या सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची नवोदय व शिष्यवृत्ती पूर्वतयारी सराव परीक्षा ॲाफलाईन घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल त्याच दिवशी जाहीर करून जिल्हास्तरावर गुणवत्ता यादी तयारी केली जाईल. त्यात पाचवीचे १५० व आठवीचे १५० असे एकूण ३०० विद्यार्थी निवडले जातील. त्यांचे पुढे मुख्य परीक्षेपर्यंत ॲानलाईन वर्ग घेतले जातील.
ॲानलाईन सत्राचे स्वरूप
सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापन शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी संधी, निवडीसाठी १ डिसेंबरला ॲाफलाईन परीक्षा, जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन, ३ डिसेंबर २०२३ ते १६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ॲानलाईन सत्राचे आयोजन, ॲानलाईन तासिकेची लिंक निवडलेल्या विद्यार्थ्यांना पाठवण्यात येईल. तासिकेची वेळ दररोज सकाळी ७ ते ८. विद्यार्थ्यांसह त्यांचे वर्गशिक्षकही सहभागी होणार.