जिल्ह्यात ४ हजार कोविड केअर सेंटर तयार,उपचारासाठी त्रिस्तरीय आराखडा,विशेष कोविड हेल्थ सेंटरसाठी एक हजार बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:41 PM2020-04-16T12:41:46+5:302020-04-16T12:42:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आता त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करणार आहे. जिल्ह्याच्या महानगरपालिका क्षेत्रात तसेच १४ तालुक्यात ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे नियोजन पूर्ण झाले असून आता प्रत्येक ठिकाणी या कोविड केअर सेंटरमधूनच (सीसीसी ) रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यात आढळलेल्या लक्षणांनुसार पुढील उपचार केले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आता त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करणार आहे. जिल्ह्याच्या महानगरपालिका क्षेत्रात तसेच १४ तालुक्यात ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे नियोजन पूर्ण झाले असून आता प्रत्येक ठिकाणी या कोविड केअर सेंटरमधूनच (सीसीसी ) रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यात आढळलेल्या लक्षणांनुसार पुढील उपचार केले जाणार आहेत.
आजाराची लक्षणे दिसतील त्यांना विशेष कोविड हेल्थ सेंटर येथे तपासणीसाठी पाठविण्यात येईल. सीसीसीसाठी जिल्ह्यात ४ हजार १०० बेडसची उपलब्धता तर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसाठी १ हजार २९ बेडसच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे डेडिकेटेड हॉस्पिटलसाठी ५४० बेडसची उपलब्धता असणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणा आणि महानगरपालिका आरोग्य विभागाशी समन्वय करुन यासंदर्भातील यंत्रणा सज्ज केली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात सीसीसी, डीसीएचसी आणि डीसीएच सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणेला पाठविल्या होत्या. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात तशी व्यवस्था करण्यात आली आहे.
सीसीसीसाठी विविध बांधून पूर्ण झालेल्या इमारती, वसतीगृहे यांच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या त्या भागातील सर्व तापाचे रुग्ण या केंद्रांवर संदर्भित केले जाणार आहेत. या सेंटरमध्ये तापाच्या रुग्णांवर उपचार केले जातील. ताप कोविड सदृश्य आजारामुळे असल्याचे निदान झाल्यास अशा रुग्णास संशयित रुग्ण कक्षात दाखल केले जाईल. अशा रुग्णांच्या घशातील स्त्राव नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल. तपासणीअंती कोविड संसर्ग असल्याचे निदर्शनास आल्यास तसेच रुग्णास आजाराची लक्षणे नसल्यास याच सीसीसी मधील विलगीकरण कक्षामध्ये त्याला दाखल केले जाईल. चाचणी अहवाल नकारात्मक आल्यास पुढील औषधोपचार देऊन घरी पाठवण्यात येईल. मात्र, रुग्णास मध्यम तीव्रतेचा आजार असल्यास त्याला विशेष अर्थात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये संदर्भीत करण्यात येईल. याठिकाणी आॅक्सिजनची व्यवस्था असणार आहे. तीव्र असल्यास त्याला थेट डेडिकेटेड कोविड ह़ॉस्पिटलमध्ये संदर्भीत करण्यात येईल. रुग्णास कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये संदर्भीय करु नये, अशा मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.