३१० भूमिहीन, बेघरांना मिळाला हक्काचा निवारा, नगर जिल्ह्यात साकारल्या ११ वसाहती
By चंद्रकांत शेळके | Published: December 8, 2023 07:35 PM2023-12-08T19:35:23+5:302023-12-08T19:35:38+5:30
अहमदनगर : प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांतून गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील ३१० भूमिहीन, बेघरांना हक्काचा ...
अहमदनगर: प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांतून गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील ३१० भूमिहीन, बेघरांना हक्काचा निवारा मिळाला आहे. या भूमिहिनांना शासनाने स्वत:ची जागा उपलब्ध करून देत राज्यात २५ वसाहती बांधल्या आहेत. त्यातील ११ वसाहती एकट्यानगर जिल्ह्यातील आहेत. सन २०१६-१७ पासून जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत घरकुले बांधली जात आहेत.
यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एकूण ६० हजार २५४ घरकुलांच्या उद्दिष्टापैकी ५४ हजार ८६८ घरकुले पूर्ण झाली आहेत. याशिवाय राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या ३५ हजार २९८ घरकुलांच्या उद्दिष्टापैकी ३० हजार ५७६ घरकुले पूर्ण झाली. म्हणजे केंद्र व राज्य शासन योजना मिळून जिल्ह्यात एकूण ८५ हजार ४४४ बेघर कुटुंबांना घरकुलाच्या रूपाने हक्काचा निवारा मिळाला आहे.
ज्यांच्याकडे स्वत:ची जागा आहे, त्यांची घरकुले तातडीने पूर्ण होत होती; परंतु आदिवासी, भटक्या जमातीतील काही लाभार्थी भूमिहीन असल्याने त्यांना घरकुले मंजूर असूनही जागेअभावी बांधता येत नव्हती. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाने त्यांना शासकीय जमीन उपलब्ध करून देत तेथे १० ते ६० घरांच्या वसाहती उभारल्या. गेल्या तीन वर्षांत राज्यात अशा २५ वसाहती उभारल्या असून त्यातील जवळपास निम्मा म्हणजे ११ वसाहती एकट्यानगर जिल्ह्यात उभारल्या आहेत. तेथे एकूण ३१० कुटुंबांची राहण्याची व्यवस्था झाली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, सहायक अभियंता किरण साळवे, तसेच प्रत्येक तालुक्याचे गटविकास अधिकारी, संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक यांनी या कामी परिश्रम घेतले.
या गावांत झाल्या वसाहती (कंसात लाभार्थी)
नांदगाव (ता. नगर) - ४०
मालुंजे (श्रीरामपूर) - २८
कणकुरी (राहाता) - २०
वांगदरी (श्रीगोंदा) - ४०
शिंगणापूर (कोपरगाव) - १०
हसनापूर (राहाता) १०
चिकणी (संगमनेर) - १८
खराडी (संगमनेर) १८
लोणी (राहाता) ६०
खारेकर्जुने (नगर) ६०
कोकमठाण (कोपरगाव) १०
एकूण ३१० कुटुंब
घरकुलांसह शासकीय योजनाही दारात
या लाभार्थ्यांना शासनाने शासकीय जागेवर घरे दिलीच; परंतु स्वच्छ भारतअंतर्गत शौचालय, १४ वा वित्त आयोग, ठक्कर बाप्पा योजनेतून अंतर्गत रस्ते, जलजीवनमधून पिण्याचे पाणी, सौभाग्य योजनेतून वीज, सीएसआर फंंडातून सांडपाणी व्यवस्था, पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन अशा सुविधाही पुरविण्यात आल्या.
प्रत्येकाला एक गुंठा जागा
या लाभार्थ्यांना प्रत्येकी एक गुंठा जागा शासनाने उपलब्ध करून दिली असून त्यात ३०० चौरस फुटांचे घर व उर्वरित जागेत रस्ता, वृक्षारोपण केलेले आहे. एक ते दीड एकर जागेवर या प्रशस्त वसाहती आहेत.