दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By Admin | Published: September 4, 2015 12:10 AM2015-09-04T00:10:00+5:302015-09-04T00:13:38+5:30

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा चार साखर कारखान्यांचा गोडवा, ७० टक्के क्षेत्र ओलिताखाली आलेल्या श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपविली आहे.

33 farmer suicides in 10 years | दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा
चार साखर कारखान्यांचा गोडवा, ७० टक्के क्षेत्र ओलिताखाली आलेल्या श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपविली आहे. आत्महत्येला शेतीमालास कमी भाव, गारपीट, पाटपाण्याचे नियोजन नसल्याने पिकांचे होत असलेले नुकसान हेच कारण आहे. अशा घटनांमुळे अनेकांच्या हृदयात वेदनेचा काहूर निर्माण झाला आहे. यंदाच्या दुष्काळाला तोंड देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पाटपाण्यामुळे ऊस मळे बहरले आणि माळरानावर डाळिंब, द्राक्ष, लिंबोणीच्या बागा बहरल्या आहेत. त्यामुळे श्रीगोंद्याला कृषी समृद्धी आली आहे. शेती फुलविण्यासाठी शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांचे हजारो कोटीचे कर्ज काढले आहे, परंतु कधी गारपीट, अतिवृष्टी, पाटपाण्याचे नियोजन नसल्याने पिकांचे नुकसान होते. या नुकसानीस कंटाळून विदर्भ, मराठवाडा परिसरातील कर्जबाजारी शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची मालिका सुरू असताना भीमा नदी काठावरील दिलीप अंकुश घोलप (वय ४५) या शेतकऱ्याने बँक व सावकारांच्या कर्जाचा धसका घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. चांगला पाऊस झाला, चांगले पीक आले तर शेतीमालास भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येतात. परिणामी सावकारांच्या कर्जाचा आधार घ्यावा लागतो. या दृष्टचक्रात शेतकरी भरडला जातो आणि कर्जाचा बोजा डोईजड झाला की डोक्यात आत्महत्येचा विचार घर करतो अशी परिस्थिती आहे. कर्जबाजारीपणामुळे २००६-०७ या वर्षात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१३-१४ मध्ये तब्बल १६ शेतकऱ्यांनी जीवनाचा शेवट केला. २०१५-१६ या वर्षात दिलीप घोलप या शेतकऱ्याने आत्महत्या करून धक्का दिला आहे. २०१५-१६ या वर्षात पाऊस पाणी नाही.
पाटपाणी मिळण्याची परिस्थिती नाही, त्यामुळे वणवा पसरणार आहे. या वणव्यात श्रीगोंद्याची शेती नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. श्रीगोंद्यातील बळीराजावर हजारो कोटीचे कर्ज आहे हे या कर्जाची परतफेड कशी करावी? असा प्रश्न प्रत्येकासमोर उभा आहे. यंदाच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची कठीण परिस्थिती निर्माण होणार असल्याने शासनाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी बँकांच्या कर्जाचे पुनर्गठण करणे गरजेचे आहे. सावकाराच्या कर्जालामुक्ती देण्याची गरज आहे. शिवाय जनावरांसाठी छावण्या आणि हाताला काम देण्याची गरज आहे अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र वाढण्याची भीती आहे.

Web Title: 33 farmer suicides in 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.