गाईच्या दुधाला आता ३४ रुपये दर, अंमलबजावणी करण्याचे मंत्री विखे पाटलांचे निर्देश
By शेखर पानसरे | Published: July 14, 2023 05:37 PM2023-07-14T17:37:31+5:302023-07-14T17:38:10+5:30
पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शेखर पानसरे
संगमनेर : दूध उत्पादक शेतक-यांना गाईच्या दुधाला ३४ रुपये दर देण्याबाबत दूध दर निश्चित समितीने केलेली शिफारस राज्य सरकारने स्विकारली आहे. राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध संघानी दूध उत्पादक शेतक-यांना ३४ रुपये दर देण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शुक्रवारी ( दि.१४) संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या महाजनसंपर्क अभियानात मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित शेतकरी, ग्रामस्थ आणि युवकांशी संवाद साधून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहीती दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री विखे पाटील म्हणाले, अडचणींचा सामना करणा-या दूध उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्याची भूमिका राज्य सरकारची होती. यासाठी राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध संघाच्या प्रतिनिधींची बैठक घेवून समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने ३४ रुपये दर देण्याची शिफारस केली. त्यानुसार राज्य सरकारने आता गाईच्या दूधाकरीता किमान ३४ रुपये प्रतिलिटर दर देण्याचा शासन आदेश काढला असून, याची अंमलबजावणी करण्याबाबतही सुचित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. दर तीन महिन्यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत शासनास शिफारस करण्याबाबतही या आदेशात सुचित करण्यात आले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.