अकोले तालुक्यातील ३४ गावे कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:08+5:302021-05-30T04:18:08+5:30
गतवर्षी २३ मे २०२० रोजी तालुक्यात लिंगदेव येथे पहिला कोरोनाबाधित आढळून आला. ३१ मे रोजी ही संख्या ११ होती. ...
गतवर्षी २३ मे २०२० रोजी तालुक्यात लिंगदेव येथे पहिला कोरोनाबाधित आढळून आला. ३१ मे रोजी ही संख्या ११ होती. गतवर्षी ३१२६ बाधित आढळून आले तर आता कोरोना संक्रमितांचा आकडा ११ हजार २६६ झाला आहे. सध्या तालुक्यात ६०५ सक्रिय रुग्ण असून ९ हजार ८९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. १४० दरम्यान रुग्ण कोरोनावर मात करू शकले नाहीत.
बिताका, जायनावाडी, पोपेरेवाडी, कोलटेंभे, वैतागवाडी, शिंगणवाडी या सहा गावात कोरोना विषाणू अद्याप प्रादुर्भाव करू शकला नाही. तर बहुतेक ठाकरवाडी-वस्त्यांमध्ये कोविड शिरकाव झालेला नाही. रतनवाडी, साम्रद, घाटघर, उडदावणे, दिगंबर, तिरडे, पाचपट्टा, म्हाळुंगी, जांभळे, जाचकवाडी, बेलापूर, सोमठाणे अशी जवळपास ३४ गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
आदिवासी दुर्गम व क्षेत्रफळाने सर्वांत मोठा तालुका व जुजबी आरोग्ययंत्रणा सुविधा असूनदेखील तुलनेने जिल्ह्यात सर्वात कमी कोरोना रुग्ण आढळून आले आहे. आदिवासींमधील रोगप्रतिकार शक्ती याचबरोबर गावोगावी वेगळे सजग झालेले प्रशासन, नागरिकांची सजगता यामुळे कमी रुग्ण आढळल्याचे दिसून येते.
सहा जिल्हा परिषद गटांपैकी सातेवाडी भागात आतापर्यंत दीड वर्षात फक्त साडेपाचशे व समशेरपूर गटात साडेआठशे कोविडबाधित आढळून आले आहेत. तर सधन बागायती धामणगाव आवारी, देवठाण, राजूर नंतर कोतुळ अशी उतरत्या क्रमाने कोविड बाधितांची संंख्या आहे.
.............
आमदारांनी घेतली आढावा बैठक
कोरोनावर मात केल्यानंतर शनिवारी प्रथमच आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी अकोले तहसीलदार कचेरीत तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्याम शेटे या तिघांसमवेत कोरोना आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील नवले हाॅस्पिटलला रुग्णवाहिका देण्यात आली, त्याचे लोकार्पण आमदार यांच्या हस्ते झाले. अगस्ती कोविड सेंटरला ही त्यांनी भेट दिली.
.............
तालुक्यातील कोरोना कमी होत असल्याने खानापूर कोविड सेंटरला थोडी विश्रांती दिली आहे. तालुक्यात कोरोनाची तिसरी लाट पोहचूच नये यासाठी आरोग्याचा अकोले पॅटर्न तयार केला जात आहे. सातेवाडी भागात दीड वर्षात साडेपाचशे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मग तिथे गरज नसताना कोविड सेंटर कसे सुरू करणार? तालुक्यात सरकारी नऊ कोविड सेंटर असून तेथे बेड शिल्लक राहतात. कोरोनात कुणीही राजकारण आणू नये. आदिवासी भागातील नागरिकांनी लस घ्यावी, यासाठी जनजागृती फेरी काढणार आहे.
- आमदार डाॅ. किरण लहामटे.
.........
बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांची कोरोना चाचणी व कोविड प्रतिबंधक लस घेण्याबाबत आदिवासी भागात आरोग्य, महसूल व ग्रामपंचायत प्रशासन जनजागृती करत आहे. त्याला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुरुषवाडी, सावरकुटे,बलठाण भागातील लोक स्वतःहून कोरोना चाचणी व लसीकरणासाठी पुढे येत आहेत.
- डाॅ. व्ही.बी. वाघ, वैद्यकीय अधिकारी, मवेशी