३५ लाखांची मानाची गदा सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने पटकावली
By साहेबराव नरसाळे | Published: April 23, 2023 09:05 PM2023-04-23T21:05:01+5:302023-04-23T21:05:06+5:30
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे ठरला उपविजेता.
अहमदनगर : येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची ३५ लाख रुपये किमतीची अर्धा किलो वजनाची गदा सोलापूर येथील महेंद्र गायकवाड याने पटकावली. ही अंतिम लढत बेमुदत निकाली होती. महेंद्रने एकचाकी मारून शिवराजला खाली टाकले. त्यामुळे शिवराज जखमी झाला. शिवराज याच्या पायाचे स्नायू तुटल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले आणि महेंद्र गायकवाड याला विजेता घोषित करण्यात आले.
भाजप, शिवसेना व जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली होती. येथील वाडिया पार्क मैदानात ही स्पर्धा पार पडली. रविवारी स्पर्धेतील अंतिम सामने झाले. यात गादी विभागातील अंतिम लढत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व माऊली कोकाटे यांच्यात झाली. ही लढत राक्षे याने १२-२ अश्या गुणफरकाने सहज जिंकत ३५ लाखांच्या गदेसाठी होणाऱ्या लढतीच्या मैदानात पाऊल ठेवले.
माती विभागातील उपमहाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही लढत अतिशय अटीतटीची झाली. ३-४च्या गुणफरकाने गायकवाडने ही लढत जिंकत सिकंदर शेखला मात दिली व स्पर्धेतील ३५ लाखांच्या मानाच्या गदेसाठी होणाऱ्या लढतीत प्रवेश मिळविला. स्पर्धेतील सुवर्ण गदेसाठीची अंतिम लढत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे (पुणे) व उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड (सोलापूर) यांच्यात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्यास सोन्याची गदा देऊन गौरविण्यात आले. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, स्पर्धेचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री आमदार राम शिंदे हे उपस्थित होते.