पहिली ते आठवीपर्यंतचे ३५ हजार विद्यार्थी पुढील वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:19 AM2021-04-06T04:19:18+5:302021-04-06T04:19:18+5:30

शेवगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ३५ हजार ५०४ विद्यार्थ्यांना पुढच्या ...

35,000 students from 1st to 8th class in the next class | पहिली ते आठवीपर्यंतचे ३५ हजार विद्यार्थी पुढील वर्गात

पहिली ते आठवीपर्यंतचे ३५ हजार विद्यार्थी पुढील वर्गात

शेवगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ३५ हजार ५०४ विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळाला आहे. या संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकताच निर्णय जाहीर केला होता. या निर्णयामुळे विद्यार्थी आनंदी असले, तरी पालकांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. विद्यार्थ्याचा अभ्यास बुडाल्याची, तसेच शिक्षणाची गोडी कमी होऊ लागल्याची भावना पालक व्यक्त करीत आहेत.

कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने मागील वर्षी २३ मार्च रोजी शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने जानेवारी, २०२१ मध्ये शाळांतील घंटा वाजली होती. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट सुरू होताच, सुरळीतपणे सुरू झालेले वर्ग मार्च अखेरीस पुन्हा बंद करावे लागले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी ( दि.३ ) १ली ते ८वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, सर्व विद्यार्थ्यांना पास करून पुढील वर्गात प्रवेश मिळाला आहे.

सलग दुसऱ्याही वर्षी परीक्षा रद्द करून पुढील वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याने, पालकांनी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. गत दोन वर्षांत बुडालेला अभ्यास, शाळेची कमी झालेली गोडी, ओढ, अभ्यासाचा सराव व लिखाणाची सवय कमी होणे आदी कारणांमुळे आगामी काळात शिक्षणावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे पालकांचे म्हणणे आहे.

------------

शैक्षणिक धोरणाप्रमाणे पहिली ते आठवीपर्यंत नापास करायचे नाही, उपस्थितीनुसार पुढील वर्गात प्रवेश मिळतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ ते ८ या वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळाला. फरक एवढाच आहे की, पूर्वी शाळेत जाऊन विद्यार्थी ज्ञान मिळवित होता, आता घरी बसून अभ्यास न करता पास होत आहे. भविष्यात मोठ्या समस्येला या विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागेल. कारण पुढील काळात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश परीक्षा देताना या दोन वर्षांतील बेसिक ज्ञानापासून ही मुले वंचित राहतील. विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना या समस्येला तोंड द्यावे लागेल. शहरातील पालक आपल्या मुलांना घरी शिकवतात. मात्र, ग्रामीण भागातील पालकांना यासाठी वेळ नाही किंवा तो जागरूक नाही. एकंदरीत हे विद्यार्थी काही प्रमाणात ज्ञानापासून वंचित राहतील.

- दिलीप फलके, माजी प्राचार्य

----------

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला मिळाला आहे. शाळांनी संपूर्ण वर्षभर ऑनलाइन, ऑफलाइन यूट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं होते. आरटीईच्या अंतर्गत म्हणजे मोफत शिक्षण अधिकाराच्या कायद्यांतर्गत, खरं तर या मुलांचे वर्षभराचं मूल्यमापन होणे तेवढेच गरजेचे होते. विद्यार्थ्यांना घरपोच प्रश्नपत्रिका देऊन अथवा ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घ्यायला हवी होती. सलग दोन वर्षे विनापरीक्षा पुढील वर्गात गेल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणाविषयी गांभीर्य कमी होण्याची शक्यता आहे. शाळा बंद असल्याने मुलांची आभास, लिखाणाची सवय मोडली आहे. याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर दुरगामी परिणाम होऊ शकतो.

- महेश फलके, पालक

------ ------

तालुक्यातील विद्यार्थी

वर्ग विद्यार्थी

पहिली ४,०९७

दुसरी ४,२७८

तिसरी ४,७०८

चौथी ४,५५८

पाचवी ४,४५६

सहावी ४,४२३

सातवी ४,४५८

आठवी ४,५२६

एकूण ३५,५०४

..............

मुली - १९,२९५

मुले - १६,२०९

Web Title: 35,000 students from 1st to 8th class in the next class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.