जिल्ह्यात ३ हजार ५८५ जागांचा राखीव कोटा : मोफत २५ टक्के जागांसाठी आॅनलाईन प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 06:50 PM2019-03-08T18:50:13+5:302019-03-08T18:50:41+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक, सामाजिक दुर्बल घटक, तसेच विधवा, घटस्पोटित, अनाथ, दिव्यांग बालकांना दर्जेदार शाळेत मोफत प्रवेश घेता येणार आहे.
अहमदनगर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक, सामाजिक दुर्बल घटक, तसेच विधवा, घटस्पोटित, अनाथ, दिव्यांग बालकांना दर्जेदार शाळेत मोफत प्रवेश घेता येणार आहे. पालकांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात इंग्रजी, ऊर्दू, मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मदत केंद्र सुरु करण्यात आले असून यात २५ टक्के जागांसाठी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरणे सुरु झाले आहे.
मदत केंद्रांवर मोफत अर्ज भरून देण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. ज्या पालकांना आॅनलाईन अर्ज भरणे शक्य नाही त्यांना अॅपद्वारे अर्ज भरता येणार आहे. पालकांच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी काही तक्रार असल्यास त्याच्या निराकरणासाठी तालुका स्तरावर तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी जिल्ह्यातील २५ टक्के पात्र शाळांची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ४०० शाळा पात्र असून पूर्व प्राथमिक वर्गासाठी २१ जागा, तर पहिलीसाठी ३ हजार ५८५ जागा रिक्त आहेत. ज्या पालकांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आॅनलाईन प्रवेश अर्ज भरावा असे आवाहन शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी केले आहे.