संगमनेरातील ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे कामकाज रामभरोसे?
By शेखर पानसरे | Published: December 7, 2022 10:13 PM2022-12-07T22:13:05+5:302022-12-07T22:13:49+5:30
जबाबदार अधिकारी बाहेर ; रात्री ‘तहसील’मध्ये दोनच महिला कर्मचारी
शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर :संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सदस्यपदांसाठी १ हजार ३२५ तर सरपंच पदासाठी २५१ नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. बुधवारी (दि.७) नामनिर्देशनपत्र मागे घेणे, निवडणूक चिन्ह नेमून देणे तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिवस होता. रात्री उशिरापर्यंत संगमनेर तहसील कार्यालयात कामकाज सुरू होते. रात्री नऊला कार्यालयात केवळ दोनच महिला कर्मचारी कर्तव्य पार पाडत होत्या. तहसीलदार अमोल निकम यांचा अपघात झाला आहे. त्यांच्यानंतर कार्यालयात कुणीही जबाबदार अधिकारी नव्हते. त्यामुळे ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे कामकाज रामभरोसे सुरू आहे का? असाच प्रश्न पडला आहे.
संगमनेर तालुक्यातील १४४ ग्रामपंचायतींपैकी ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक होत आहेत. यात घुलेवाडी, साकूर, तळेगाव दिघे, खराडी, वाघापूर, चिंचोली गुरव, रणखांबवाडी, दरेवाडी, जांबूत बुद्रूक, कर्जुले पठार, डोळासणे, पिंपरणे, कोल्हेवाडी, कोळवाडे, मालुंजे, अंभोरे, निंबाळे, जोर्वे, वडझरी बुद्रूक, निमोण, वडझरी खुर्द, हंगेवाडी, कनकापूर, करूले, निळवंडे, पोखरी हवेली, सादतपूर, रहिमपूर, उंबरी बाळापूर, निमगाव जाळी, ओझर खुर्द, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बु्द्रूक, निमगाव भोजापूर, चिकणी, सायखिंडी या गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत आहेत. निवडणुकांचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होते. निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी अंधार झाल्यानंतर मोबाईल टॉर्चच्या उजेडात काम करत होते.
अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी व इतर माहिती घेण्यासाठी पत्रकार तहसील कार्यालयात संध्याकाळी सात वाजेपासून थांबले होते. रात्री नऊ वाजून गेल्यानंतरही माहिती मिळाली नाही. नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तहसील कार्यालयातील दोन महिला कर्मचारी माहिती घेत होत्या, त्यांचे संगणकावर काम सुरू होते. परंतू कार्यालयात इतर कुणीही जबाबदार पुरूष अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हते. नायब तहसीलदारांची दालने बंद होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"