निवारा गृहातील ३८ जण विशेष रेल्वेने मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 01:26 PM2020-05-08T13:26:11+5:302020-05-08T13:26:41+5:30
राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळा येथील निवारागृहातील मध्यप्रदेश राज्यातील २३ जण तर उत्तरप्रदेश राज्यातील १५ जणांना गुरुवारी सायंकाळी विशेष रेल्वेने स्वगृही पाठवण्यात आले.
राहुरी : येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळा येथील निवारागृहातील मध्यप्रदेश राज्यातील २३ जण तर उत्तरप्रदेश राज्यातील १५ जणांना गुरुवारी सायंकाळी विशेष रेल्वेने स्वगृही पाठवण्यात आले.
लोकडाऊनमुळे वाहतुकीचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे राहुरीत अनेक व्यक्ती अडकून पडल्या होत्या. सदर व्यक्तींसाठी राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळेत निवारागृहात सोय करण्यात आली होती. यापैकी उत्तर प्रदेश राज्यातील १५ व्यक्तींना (सर्व पुरुष) गुरुवारी (दि.८ मे) अहमदनगर येथून विशेष रेल्वेने लखनौ येथे तर मध्य प्रदेश राज्यातील २३ व्यक्तींना (यात १८ पुरुष, २ महिला व ३ मुलांचा समावेश आहे.) विशेष रेल्वेने अहमदनगर येथून भोपाळ येथे स्वगृही रवाना करण्यात आले.
या व्यक्तींना बसने अहमदनगरला नेण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्वांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले. फिजीकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बैठक व्यवस्था करण्यात आली होती. या परराज्यातील व्यक्तींना निरोप देण्यासाठी उपविभागीय अधिकारी असिमा मित्तल, तहसीलदार फसियोद्दीन शेख, निवारागृह समन्वयक मोहनीराज तुंबारे, नायब तहसीलदार गणेश तळेकर, डॉ. नलिनी विखे आदी उपस्थित होते.
..