गायी, म्हशी, कुत्रे, मांजरांच्या अंत्यसंस्कारासाठी ४० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:22 AM2021-09-03T04:22:16+5:302021-09-03T04:22:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील पुढील वर्षभरात मृत पावणाऱ्या गायी, म्हशी, कुत्रे, मांजरांवरील अंत्यसंस्कारावर तब्बल ४० लाखांचा खर्च ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहरातील पुढील वर्षभरात मृत पावणाऱ्या गायी, म्हशी, कुत्रे, मांजरांवरील अंत्यसंस्कारावर तब्बल ४० लाखांचा खर्च केला जाणार आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे. त्यावर उद्या शुक्रवारी होणाऱ्या सभेत चर्चा होणार आहे. गायी, म्हशी, कुत्रे, मांजरांच्या अत्यसंस्कारावरील खर्चाचा हा पहिलाच प्रस्ताव आहे.
महापालिकेने शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी बुरुडगाव येथे डेड ॲनिमल इंसिनरेटर प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प महापालिकेच्या मालकीचा आहे. परंतु, तो ठेकेदारामार्फत चालविण्यात येतो. मागील सप्टेंबर २०२० मध्ये येथील मे. आर्या एंटरप्रायजेस या संस्थेला हा प्रकल्प चालविण्यास दिला होता. त्याबदल्यात संबंधित संस्थेला दरमहा २ लाख ७०, याप्रमाणे १२ महिन्यांचे ३२ लाख ४० हजार रुपये अदा करण्यात आलेले आहेत. या संस्थेची मुदत संपल्याने नव्याने निविदा मागविल्या गेल्या. प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी मे. आर्या व अमृत इलेक्ट्रो ॲण्ड ॲटोमेशन यांच्या प्रत्येकी एक निविदा प्राप्त झाल्या होत्या. परंतु, कागदपत्रे अपुरी असल्याने अमृत संस्थेची निविदा बाद झाली. एकमेव आर्या संस्थेची निविदा पात्र ठरली असून, सदर संस्थेने प्रकल्प देखभाल व दुरुस्तीसाठी महिन्याला ३ लाख २४ हजार इतक्या मोबदल्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना ठेकेदाराने गॅस वाढीचे कारण दिले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसह मृत जनावरांच्या अंत्यसंस्काराच्या खर्चात महिन्याला ५४ हजारांची वाढ होणार आहे.
........
आर्या संस्थेला दुसऱ्यांदा काम
बुरुडगाव येथील प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून येथील आर्या संस्था काम करत असून, दुसऱ्यांदा एकमेव आर्या संस्थेचीच निविदा पात्र ठरली आहे. त्यामुळे आर्या संस्थेलाच हे काम जाण्याची दाट शक्यता असून, या संस्थेला वर्षाला ३८ लाख ८८ हजार रुपये अदा केले जाणार आहेत.
...
अंत्यसंस्कारावर २६०० रुपये खर्च
महापालिकेच्या घनकचरा विभागाने मागील जुलै महिन्यात शहरातील विविध वभागात १२१ गायी, म्हशी, कुत्रे माजरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रस्तावात दिली आहे. त्यानुसार हे दर ठरविण्यात आले असून, प्रत्येक जनावराच्या अंत्यविधीवर २ हजार ६०० रुपये खर्च होणार आहेत.
....
व्हेज, नॉनव्हेजच्या वेस्टवर ३ लाख २४ हजार रुपये खर्च
शहरातील व्हेज व नॉनव्हेज वेस्ट मटेरियलची विल्हेवाट लावण्यासाठी बुरुडगाव कचरा डेपोत प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. हा प्रकल्प ठेकेदारामाफत चालविण्यात येत असून, त्याबदल्यात ठेेेकेदाराला महिन्याला ३ लाख २४ हजार रुपये अदा केले जातात.
....